परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची लोणावळा बसस्थानकाला भेट
बसस्थानक परिसराची केली पाहणी; प्रवाशांशी साधला संवाद

पुणे | राज्याचे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांची आज लोणावळा बसस्थानकाला भेट देवून परिसराची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे नियोजन व पणन महाव्यवस्थापक जयेश बामणे, प्रादेशिक व्यवस्थापक अमृता ताम्हणकर, विभाग नियंत्रक अरुण सिया,आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बसस्थानक येथील प्रसाधनगृहाची पाहणी उपहारगृहालाही भेट दिल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, मंत्री महोदय भेट देणार आहेत म्हणून केवळ एका दिवसापुरती बसस्थानकाची स्वच्छता करू नका, प्रवाशांना दररोज स्वच्छ, टापटीप बसस्थानक, निर्जंतूक प्रसाधनगृहे आणि वाजवी दरामध्ये खाद्यपदार्थ मिळतील असे उपहारगृह असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने स्थानिक एसटी प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश यावेळी दिले.
हेही वाचा : ‘माझ्या बुद्धीची किंमत महिन्याला २०० कोटी, पैशांसाठी खालच्या स्तरावर जाणार नाही’; नितीन गडकरी

यावेळी प्रताप सरनाईक यांनी बसस्थानकावर प्रतिक्षालयात असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला असता काही प्रवाशांनी लोणावळा बसस्थानकावर वेळापत्रकानुसार नियोजित बसेस येत नाहीत. त्यामुळे दीर्घकाळ बसची वाट बघावी लागते, अशी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत, पुणे प्रादेशिक व्यवस्थापकांनी सर्व बसेस वेळापत्रकानुसार लोणावळा बसस्थानकावर आल्या पाहिजेत, अशी सूचना संबंधित आगार व्यवस्थापक यांना देण्याच्या सूचना प्रताप सरनाईक यांनी केली.





