चिखली गावठाणमध्ये काय होणार? भाजपाचे ‘कमळ’ फुलणार की राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’ चा गजर?
ग्राऊंड रिपोर्ट: प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपा- राष्ट्रवादीची ताकद तुल्यबळ
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ करणार आहोत. (कमळ की घड्याळ )
महापालिका प्रारुप प्रभाग रचना शुक्रवारी प्रसिद्ध झाली. 2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये मोरे वस्ती आणि सोनवणे वस्तीतील काही किरकोळ बदल वगळता प्रभागात कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 57 हजार 149 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 7 हजार 759 इतकी अनुसूचित जाती आणि 751 इतिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये या प्रभागामध्ये भाजपाची मोठी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत विरोधी पक्षनेते दत्ताकाका साने निवडून आले होते. भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेल्या दत्ताकाकांनी 2017 च्या निवडणुकीनंतर महेश लांडगे यांचा प्रखर विरोधाची भूमिका घेतली. दत्ताकाका यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा यश साने सक्रीय झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून यश साने निवडणुकीच्या रिंगणात उतरतील किंवा त्यांच्या मातोश्रीसुद्धा उमेदवार असतील अशी चर्चा आहे. पण, यश साने लढण्यावर ठाम आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटाचे विकास साने यांनीही तयारी केली आहे.
2017 च्या आरक्षणानुसार, अ- अनुसूचित जाती, ब- नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग- महिला, क- सर्वसाधारण महिला आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये काही फार बदल होईल, असे चित्र नाही.
भारतीय जनता पार्टीकडून 2017 मध्ये कुंदन गायकवाड, स्वीनल म्हेत्रे, अलका मोरे आणि पांडूरंग साने यांनी निवडणूक लढवली होती. यापैकी कुंदन गायकवाड आणि स्वीनल म्हेत्रे यांनी बाजी मारली. तर अलका मोरे आणि पांडुरंग साने यांना पराभव पत्कारावा लागला होता. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दत्ताकाका साने यांनी निवडणूक जिंकली. त्यांना सर्वाधिक 9 हजार 926 इतकी मते मिळाली होती. तसेच, क- गटातील सर्वसाधारण महिला जागेवर साधना मळेकर यांनी विजय मिळवला होता.
2014, 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता या प्रभागातून आमदार महेश लांडगे यांना 2024 च्या निवडणुकीत 8 हजार 500 हून अधिक मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे प्रभागामध्ये दिवंगत दत्ताकाकांची पुण्याई की आमदार महेश लांडगे यांची जादू चालणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
गेल्या १० वर्षांत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संतपीठ, डीपी रस्ते, पोलीस आयुक्तालय सारखे महत्त्वाकांक्षी विकासकामे झाली आहेत. आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्त्वात या भागाचा कायापालट झाला असून, या भाजपाला जनाधार आहे.
– कुंदन गायकवाड, भाजपा.
स्व. दत्ताकाका साने यांनी 15 वर्षे या प्रभागाचे नेतृत्त्व केले आहे. राष्ट्रवादीची ताकद प्रभागामध्ये जास्त आहे. आरक्षण सोडतीनंतर चित्र स्पष्ट होईल. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्त्वात आम्ही निवडणूक यशस्वीपणे जिंकणार आहोत.
– यश साने, राष्ट्रवादी.







