सावधान! अरबी समुद्र खवळला, वादळी वाऱ्यांचा इशारा
मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना
मुंबई : राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार पावसाचा कहर सुरु असताना हवामान विभागाने आणखी एक धोक्याचा इशारा दिला आहे. अरबी समुद्र खवळलेला असून समुद्रात वाऱ्याचा वेग झपाट्याने वाढतोय. त्यामुळे 18 ते 22 ऑगस्टदरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये पुढील काही तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
समुद्र खवळलेला – वाऱ्याचा वेग धोक्याच्या टप्प्यात
हवामान विभागाच्या माहितीनुसार, समुद्रातील वाऱ्याचा वेग उत्तर महाराष्ट्रात 50 ते 60 किमी प्रतितास असून तो 70 किमी प्रतितासपर्यंत वाढू शकतो. दक्षिण महाराष्ट्रात हा वेग 45 ते 55 किमी प्रतितास असून तो 65 किमी प्रतितासपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. यामुळे समुद्र खवळलेला असून लाटांची उंची 3.14 मीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. भरतीची वेळ आज रात्री 8:53 वाजता आहे.
मच्छीमारांना धोक्याचा इशारा
या परिस्थितीला पाहता मत्स्यव्यवसाय विभाग आणि हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मच्छीमार सहकारी संस्था, नौका मालक यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वित्तीय व जीवित हानी टाळण्यासाठी या काळात कोणतीही जोखीम न पत्करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाचे :
-
22 ऑगस्टपर्यंत समुद्रात न जाण्याचे आवाहन
-
वाऱ्याचा वेग 70 किमी/ता. पर्यंत जाण्याची शक्यता
-
किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस
-
मच्छीमार, नौका चालकांनी विशेष खबरदारी घ्यावी
राज्यभरात पावसाचा जोर वाढत असल्याने प्रशासन सतर्क झालं आहे.





