निगडीत गॅस पाइपलाइनमध्ये उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू
सुरक्षा साधनांशिवाय कामावर पाठवणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी; एक जखमी
पिंपरी चिंचवड : निगडी प्राधिकरण सेक्टर २४ येथील लोकमान्य हॉस्पिटलजवळ, शामराव विठ्ठल को-ऑप. बँकेसमोर बीएसएनएलच्या केबल दुरुस्तीच्या कामादरम्यान आज (१५ ऑगस्ट) मोठी दुर्घटना घडली. गॅस पाइपलाइनमध्ये उतरलेल्या चार सफाई कर्मचाऱ्यांपैकी तिघांचा विषारी वायूमुळे गुदमरून मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात उपचार घेत आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राथमिक तपासणीत उघड झाले की, संबंधित ठेकेदाराने कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून न देता कामगारांना पाइपलाइनमध्ये उतरवले होते. पाइपलाइनमधील गॅसचे प्रमाण अधिक असल्याने श्वास घेता न आल्यामुळे तिघांचा जागीच मृत्यू झाला. या गंभीर निष्काळजीपणामुळे ठेकेदार आणि प्रशासनाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हेही वाचा : व्यक्तीविशेष: डॉ. बाळासाहेब वाफरे यांना ‘नोबेल रिसर्च अवॉर्ड’
या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे पिंपरी चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे तातडीने दखल घेऊन संबंधित ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यांनी सांगितले, “सुरक्षा सामग्री न देता अशा धोकादायक कामासाठी कामगारांना उतरवणे ही माणुसकीची हत्या आहे. यापूर्वीही सेक्टर २३ मध्ये पाण्याच्या टाकीत उतरलेल्या दोन कामगारांचा मृत्यू झाला होता, पण पालिकेने कोणतीही आर्थिक मदत केली नाही. आता पुन्हा अशा प्रकारची घटना घडल्याने जबाबदारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”
मृत कामगारांची नावे:
लखन ढावरे (वय 30-32, रा. बिजलीनगर)
दत्ता होनाले (वय 35-38, रा. गुरुद्वारा कॉलनी)
दादा साहेबराव गिरसेट (वय 35-36, रा. बिजलीनगर)
महत्त्वाचे मुद्दे:
गॅस पाइपलाइनमध्ये उतरलेले चार कर्मचारी.
सुरक्षेअभावी तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी.
ठेकेदाराने सुरक्षा साधने पुरवली नाहीत.
भाजप पदाधिकाऱ्यांकडून फौजदारी कारवाईची मागणी.





