“६.३० वाजता विमान हायजॅक करू”; इंडिगो विमानाला हवेतच अपहरणाची धमकी, बंगळुरूमध्ये तातडीचे लँडिंग

बंगळुरू | बंगळुरूहून लखनौसाठी झेपावलेल्या इंडिगोच्या विमानात हवेतच हायजॅकची धमकी मिळाल्याने मोठी खळबळ उडाली. विमानातील वॉशरुममध्ये हाताने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली, ज्यामध्ये विमान अपहरणाचा इशारा देण्यात आला होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पायलटने विमान तत्काळ मागे फिरवून पुन्हा बंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवले. विमानातील सर्व १७८ प्रवासी सुखरूप असून विमानतळ पोलिसांसह सुरक्षा यंत्रणांनी याप्रकरणी कसून तपास सुरू केला आहे.
इंडिगोचे ‘6E 451’ हे विमान ७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५.५० वाजता बंगळुरूहून लखनौसाठी रवाना झाले होते. उड्डाणानंतर काही वेळातच विमानातील वॉशरुममध्ये एका कागदावर, “हे विमान ठीक साडेसहा वाजता (६.३०) हायजॅक केले जाणार आहे,” असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी क्रू मेंबर्सच्या निदर्शनास आली. वैमानिकाने विनाविलंब हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी (ATC) संपर्क साधून सुरक्षा प्रोटोकॉलनुसार विमान बंगळुरूच्या दिशेने वळवले. विमान लँड झाल्यानंतर सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढून विमानाची तपासणी करण्यात आली; तसेच ही चिठ्ठी कोणी लिहिली याचा शोध घेण्यासाठी प्रवाशांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा
सुरक्षा तपासणीनंतरच पुढील उड्डाण: इंडिगो
या घटनेला दुजोरा देत इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रवाशांची सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता असल्याने विहित मानकांनुसार विमान परत आणण्यात आले. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत त्यांना अल्पोपहार देण्यात आला असून, सुरक्षा यंत्रणांची पूर्ण मंजुरी (Security Clearance) मिळाल्यानंतरच हे विमान लखनौसाठी रवाना केले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
इंडिगोच्या विमानांना लागोपाठ सुरक्षेचा धोका
गेल्या दोन दिवसांत इंडिगोच्या विमानांमध्ये सुरक्षेला धोका निर्माण होण्याची ही दुसरी धक्कादायक घटना असून, या घटनेच्या अवघ्या एक दिवस आधी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या ‘6E 6091’ या विमानाच्या टॉयलेटमध्ये चेतावणी देणारी चिठ्ठी सापडल्याने बॉम्बची धमकी निर्माण झाली होती, जी सुदैवाने तपासणीनंतर अफवा असल्याचे निष्पन्न झाले; तर दुसऱ्या एका घटनेत दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एका प्रवाशाने उड्डाणानंतर आपत्कालीन दरवाजाच्या (Emergency Exit) यंत्रणेशी छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




