भिवंडीत भाजप पदाधिकाऱ्यासह दोघांची निघृण हत्या, कार्यालयात बसले असताना हल्ला

मुंबई | भिवंडीत झालेल्या दुहेरी हत्येनं शहरात खळबळ उडाली आहे. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. ही घटना भिवंडीतील खारबाव–चिंचोटी रस्त्यावरील खार्डी येथे रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रफुल्ल तांगडी हे त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह कार्यालयात बसले असताना चार ते पाच जणांनी अचानक हल्ला केला. यात प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
हेही वाचा : आमदार सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात रोजगार हमी योजनेच्या प्रकल्पांची पाहणी
या हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रफुल्ल तांगडी यांच्यावर यापूर्वीही, वर्षभरापूर्वी हल्ला झाला होता, मात्र तेव्हा ते बचावले होते. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ माजली आहे. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.





