Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मराठी चित्रपटसृष्टी महाराष्ट्राचे वैभव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि कलावंत हे महाराष्ट्राचे वैभव असून दादासाहेब फाळके यांच्या “राजा हरिश्चंद्र” चित्रपटाच्या रुपाने रुजलेलं हे बीज आज वटवृक्ष बनलं आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादित आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५ व चित्रपती कै. व्ही. शांताराम तसेच स्व. राज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार २०२५ तसेच ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा वरळी येथे एसव्हीपी स्टेडियम, डोम येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठी रंगभूमी ही जगातील सर्वोत्कृष्ट रंगभूमी आहे. छोटा पडदा, मोठा पडदा, ओटीटी प्लॅटफॉर्म अशा विविध माध्यमांत मराठी कलावंतांनी अप्रतिम योगदान दिले आहे. केवळ कलावंतच नाही तर पडद्यामागे काम करणाऱ्या सर्वांचा मनापासून गौरव व्हावा, हीच महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. राज्य सरकार तुमच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अनुपम खेर यांच्या बहुप्रतिभावान अभिनयाचा गौरव करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पहिल्याच चित्रपटात 70 वर्षांच्या वृद्धाची भूमिका साकारणारे खेर आजही तितक्याच उत्साहाने अभिनय करत आहेत.”

मुक्ता बर्वे यांच्या 360 अंश अभिनय क्षमतेचा, विशेषतः ‘चार चौघी’ मधील त्यांच्या मोनोलॉगचा, तसेच महेश मांजरेकर यांच्या दमदार अभिनय आणि दिग्दर्शनाचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी गौरव केला. गझलकार भीमराव पांचाळे यांचा उल्लेख करताना श्री फडणवीस म्हणाले, “सुरेश भट आणि भीमराव पांचाळे यांची जोडी मराठी गझलांना अविस्मरणीय उंचीवर घेऊन गेली.”

हेही वाचा       :        राज्य शासनाच्या मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे हीरक महोत्सवी पर्व उत्साहात संपन्न 

“शिवाजी महाराजांच्या नावाने जागतिक वारसा मिळविणे हे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचे क्षण आहे,” असं ते म्हणाले. “मराठी चित्रपटसृष्टी आमचं वैभव आहे आणि ती भविष्यात अधिक समृद्ध होईल, असा मला विश्वास आहे,” अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते गजलगायक भीमराव पांचाळे यांना “गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025” प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर पद्मश्री काजोल देवगण यांना स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार 2024, पद्मभूषण अनुपम खेर यांना स्व.राज कपूर जीवनगौरव पुरस्कार 2024, अनिनेत्री मुक्ता बर्वे यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार 2024 आणि निर्माते महेश मांजरेकर यांना चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार 2024 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

यावर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला “छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025” हा युनेस्कोतील भारताचे कायस्वरूपी प्रतिनिधी राजदूत विशाल शर्मा यांना मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणाऱ्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषिकेश यादव, दुर्ग अभ्यासक माधव फडके यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी 60 आणि 61 व्या हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे – पाटील, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभागाचे संचालक डॉ.तेजस गर्गे, चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकार, कलारसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button