स्पाईन रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे अपघातांची मालिका
राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची तात्काळ कारवाईची मागणी, पोलिसांकडून आश्वासन

पिंपरी-चिंचवड । चिखली परिसरातील स्पाईन रोडवर वाढत्या अनधिकृत वाहन पार्किंगमुळे रहदारी व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. टेम्पो, ट्रक आणि बस यांचे रस्त्यावरच थांबलेले वाहनांचे साठे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मोठा धोका ठरत आहेत. विशेषतः अटल बिहारी वाजपेयी गार्डन परिसरात शनिवारी व रविवारी संध्याकाळी पार्किंगमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सुटता सुटत नाही.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी उभ्या राहणाऱ्या मोठ्या वाहनांमुळे वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना चालणेही धोकादायक ठरले आहे. संकुचित रस्ते, अपुऱ्या सुविधा आणि बेपर्वाईने लावलेली वाहने यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याची चिंता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : पहलगाम दहशतवादी हल्ल्यातल्या तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान; अमित शाह यांची लोकसभेत माहिती
या समस्येवर तोडगा शोधण्याकरिता पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष व राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांनी पुढाकार घेत, चिखली पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांची भेट घेतली. त्यांनी परिसरातील गंभीर परिस्थितीची माहिती दिली व गार्डन बाहेरील अनधिकृत पार्किंग तात्काळ हटवण्याची तसेच संबंधित वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली.
अरुण पाडुळे यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत साळुंखे साहेबांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले असून, पोलिस पथकांकडून नियमित पेट्रोलिंग आणि पार्किंगवर लक्ष ठेवले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. स्थानिक नागरिकांमध्ये या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण असून, लवकरच परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
“स्पाईन रोडवरील अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी ही परिस्थिती अत्यंत असुरक्षित आहे. प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन, अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, हीच आमची स्पष्ट मागणी आहे.”
– अरुण पाडुळे, अध्यक्ष, पुण्यश्लोक राजमाता प्रतिष्ठान.





