पुढील २४ तासांत पाऊस हाहाकार माजवणार, पुण्यासह ‘या’ ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर

Maharashtra Weather | राज्यात पावसाने पुन्हा एकदा जोर धरला असून पुढील 24 तास अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण कोकण, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या घाटमाथ्यांसह अनेक जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यात पावसाचं स्वरूप आणखी तीव्र होणार असून किनारपट्टीपासून विदर्भापर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा : पंतप्रधान मोदी ब्रिटनच्या दौऱ्यावर; तीन वर्षांच्या वाटाघाटीनंतर मुक्त व्यापार करारावर स्वाक्षऱ्या
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई शहर व उपनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर घाटमाथा येथे रेड अलर्ट तर कोल्हापूर, सांगली, पालघर, नाशिक, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उद्या म्हणजेच 25 जुलै रोजी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग येथे रेड अलर्ट आणि ठाणे, मुंबई, नागपूर, भंडारा येथे येलो अलर्ट देण्यात आला आहे.
काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता असून नदीकाठच्या भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. प्रशासन सतर्क असून मदत यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. जलभराव व वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.





