ताज्या घडामोडीविदर्भ विभाग

‘राष्ट्रवादी’ च्या कार्यकर्त्यांनी ‘छावा’ वाल्यांना बेदम चोपले!

अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून 'छावा' च्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण.. निषेधाच्या घोषणांनी पत्रकार परिषद दणाणली !

लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे निवेदन देऊन वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘छावा’ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याची घटना लातूरमध्ये घडली आहे. गेल्याच आठवड्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधिमंडळाच्या लॉबीत झालेल्या तुंबळ हाणामारीनंतर हा राडा झाल्याने राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.

अजितदादांचे कार्यकर्ते आक्रमक..

लातूर येथे छावा संघटनेचे पदाधिकारी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत हाणामारी झाली असल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि राजकारणामध्ये पुन्हा एकदा हाणामारी हा चर्चेच्या केंद्रस्थानी पुन्हा हा विषय आला. गेल्याच आठवड्यात विधिमंडळात हाणामारी झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच पुन्हा एकदा राडा झाला आहे. या मुद्द्यावर आता विरोधकांच्या दृष्टीने ‘सरकार’ हेच लक्ष झाले असून त्यातून मार्ग कसा निघतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.

‘छावा’ संघटनेने पत्ते फेकले..

‘महायुती’ सरकारमधील कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये मोबाईलवर रमी खेळल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील असंतोष उफाळून आला. कोकाटे यांच्यासारखा मंत्री वारंवार बेछूट आणि बेताल वक्तव्ये करतो, पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, याबद्दल सर्वत्र टीकेची झोड उठत आहे. या पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या टेबलावर पत्ते फेकल्यानंतर हा प्रकार घडला आहे. या घटनेचाही व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा –  संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन, 32 दिवसांच्या कालावधीत एकूण 21 बैठका : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू

घटनेच्या ठिकाणी नेमके काय घडले ?

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेच्या सभागृहात रमी खेळतानाचा कथित व्हीडिओ समोर आला आहे. या व्हीडिओनंतर आता राज्यभरातून सरकारवर टीका केली जात आहे, सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे बसलेले असताना छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आक्रमक होत त्यांच्यासमोर पत्ते टाकले होते. तसेच हे घ्या पत्ते आणि मंत्र्‍यांना तुमच्या घरी पत्ते खेळायला सांगा, असे म्हणत कोकाटेंचा निषेध केला.

‘राष्ट्रवादी’ चे कार्यकर्ते संतप्त..

याच घटनेनंतर तेथे हजर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला, तटकरे यांनीदेखील समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण, त्यांची घोषणाबाजी सुरूच राहिली. त्यांना बाहेर हकलत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

माणिकराव कोकाटे यांचा तीव्र निषेध..

छावा संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते आणि सुनील तटकरे यांच्यापुढे त्यांनी माणिकराव कोकाटे यांचा निषेध असो, या सरकारचे करायचे काय? खाली मुंडके वर पाय.. अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. या घटनेचा व्हीडिओ आता समोर आला आहे. व्हीडिओत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बेदम मारहाण करताना दिसत आहेत. तसेच मारहाण करताना शिवीगाळही केली जात आहे. या मारहाणीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण हेदेखील आहेत. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

छावा संघटनेने काय सांगितले?

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूरमध्ये आले होते. यावेळी आम्ही त्यांना कृषीमंत्र्यांविरोधात निवेदन दिले. हे निवेदन देताना मी हे पत्ते घ्या आणि कृषीमंत्र्यांना ते पत्ते द्या. त्यांना पदावरून बडतर्फ करा, असे आम्ही त्यांना सांगितले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या गुंडांनी येऊन आमच्यावर अचानक हल्ला केला. आम्हाला अमानुष मारहाण केली. हा हल्ला शेतकऱ्यांच्या पोरांवर आहे. राष्ट्रवादीची हीच वागणूक आहे का आणि हाच खरा चेहरा आहे का ? असा माझा सवाल असल्याचे छावा संघटनेचे पदाधिकारी विजयकुमार घाडगे पाटील यांनी केला.

याची किंमत मोजावी लागणार..

अजित पवार हे शेतकऱ्यांसाठी मोठ्या गप्पा करतात. तुम्ही असे चुकीचे कृषीमंत्री राज्याला देत आहात आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मारहाण करत आहात, याची किंमत तुम्हाला मोजावी लागणार, असा इशाराही छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानी दिला आहे.

पोलीस चौकी बाहेर कार्यकर्ते जमले..

या संपूर्ण प्रकारानंतर लातूर मधील पोलीस चौकी बाहेर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली आणि कृषिमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. त्याचप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महायुती सरकारच्या विरोधातही आपला असंतोष घोषणांच्या माध्यमातून व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई?

राज्यातील सरकार विरोधात सध्या वातावरण एवढे पेटले आहे की, सभागृहात रमी खेळणाऱ्या कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. प्रत्येकवेळी काहीतरी वादग्रस्त बोलायचे आणि सरकारला अडचणीत आणण्याचे धोरण माणिकराव कोकाटे यांचे असल्यामुळे त्यांना कायमच घरी बसवण्याचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षाचे नेते अजित पवार यांना दिला असल्याचे समजते. शेतकऱ्यांवर वाटेल ते आरोप करून ते आधीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असताना आता सभागृहात रमी खेळत असताना त्यांचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे आणि विरोधकांनी जोरदार टीका सुरू केली आहे, त्यामुळे त्याचे फळ त्यांना भोगावेच लागेल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button