ड्रग्जची तस्करी करणाऱ्यांवर आता मकोका लागणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : राज्यात होत असलेल्या ड्रग्सच्या तस्करीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली असून आता ड्रग्स तस्करी करणाऱ्यांवर मकोका लागणार अशी मोठी घोषणा केली आहे. राज्यात ड्रग्जची तस्करी खपवून घेतली जाणार नाही. असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. राज्यातील ड्रग्सची पाळंमुळं खोदून काढण्यासाठी सरकारने मोठं पाऊल उचललण्याने ड्रग्स तस्करांचे धाबे चांगलेच दणाणार आहेत.
विधान परिषदेत राज्यात होणाऱ्या एमडी ड्रग्सच्या तस्करीवरून चर्चा झाली. भाजपचे आमदार परिणय फुके यांनी याबाबत सभागृहात सवाल केला. राज्यात मेफेड्रोनची तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कारवाई करण्याची गरज आहे. ड्रग्सचा विळखा पडतो आहे. आपली संख्या त्यात सर्वाधिक आहे. तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे या सर्वांवर मकोका लावून कारवाई करणार का? ड्रग्स तस्करी करणाऱ्यांना लगेच जामीन मिळतो. त्यामुळे या केसेस फास्टट्रॅक कोर्टात घेणार का? असे प्रश्न उपस्थति करण्यात आले.
हेही वाचा – ‘परवानाधारक व्यापाऱ्यांनाच बांधावर जाऊन शेतमाल खरेदीची परवानगी’; पणन मंत्री जयकुमार रावल
या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे. एमडी ड्रग्स आणि इतर अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ड्रग्ज कारवायांमध्ये प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र युनिट कार्यान्वित करण्यात आलेले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. मोठ्या केसेससाठी केंद्राकडे फास्ट ट्रॅक कोर्टाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.
या चर्चेदरम्यान, एकनाथ खडसे यांनीही या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली. मध्यप्रदेश व गुजरातसारख्या राज्यांतून अफू व गांजाची तस्करी जळगाव जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात होते, असे खडसे यांनी सांगितले. यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले, काही राज्यांमध्ये भांगला परवानगी असली तरी महाराष्ट्रात अफू किंवा अशा अंमली पदार्थांना कोणतीही परवानगी नाही. मुक्ताईनगरसारख्या भागांमध्ये जर असे प्रकार होत असतील तर त्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी यावेळी दिले.





