Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

परभणीमध्ये जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस पावसाचे; ‘वनामकृवि’चा अंदाज

परभणी : परभणी, नांदेड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे गेले काही दिवस वाढलेल्या कमालीच्या तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. दरम्यान पुढील तीन दिवस पावसाचे असल्याचा अंदाज ‘वनामकृवि’कडून वर्तविण्यात आला आहे.

परभणी – जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी दुपारी जोरदार पाऊस कोसळल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले. दुपारी चारच्या दरम्यानही आकाश अंधारून आल्याचे चित्र होते. गेल्या दोन दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा खाली आला, तो शनिवारी ३७ अंशावर होता.पुढील दोन-तीन दिवस पावसाचे असतील असा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला होता. छत्रपती संभाजीनगर वगळता बीड, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये पाऊस अपेक्षित आहे.

हेही वाचा –  पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी संदीपसिंग गिल

परभणीत शनिवारी दिवसभर आकाश ढगाळ होते. दुपारी हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता. या दिवसात नेहमीच बिगरमोसमी पाऊस काही सरींच्या रूपात कोसळतो आणि लगेचच वातावरण निवळते. पण शनिवारी मात्र चक्क पावसाळ्याप्रमाणेच दिवसभराचे वातावरण होते. दुपारनंतर तर सूर्यदर्शन झालेच नाही. आकाशात पावसाळ्यासारखी ढगांनी दाटी केली होती. दुपारी सलग काही मिनिटे कोसळलेल्या पावसाचा वेग अक्षरशः तडाखेबंद होता. या पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी केले. दुपारनंतरही पावसाचे वातावरण निवळलेले नव्हते.

सध्या शेतात खरीप हंगामपूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आलेली आहेत. आणखी काही दिवसांनी शेतकरी पेरणीसाठी सज्ज राहणार आहे. ही कामे चाललेली असतानाच पावसाने जोरदार तडाखा दिल्याने दुपारनंतर शेतातली कामे खोळंबून राहिली. ग्रामीण भागात असलेल्या विवाहसमारंभांनाही या पावसाचा मोठा फटका बसला. खेड्यापाड्यात सुसज्ज अशी मंगल कार्यालये नसतात. कापडी मंडपातच बहुतेक विवाह पार पडतात. अचानक आलेल्या या पावसाने वऱ्हाडी मंडळींची धांदल उडाली. कापडी मंडप भिजल्याने लग्न समारंभस्थळी मोठीच गैरसोय झाली.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button