काश्मिरात दहशतवाद्यांचे छुपे हल्ले
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/army-1-.jpg)
पाकप्रशिक्षित ४ स्नायपर्स खोऱ्यात सक्रिय
जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांकडून लपून होणारे हल्ले (स्नायपर अटॅक) ही काश्मीर खोऱ्यातील सुरक्षा दलांसाठी चिंतेची बाब बनली आहे. सप्टेंबरच्या मध्यापासून अशा हल्ल्यांमध्ये सुरक्षा दलांचे ३ कर्मचारी मारले गेले आहेत. पाकिस्तानने प्रशिक्षण दिलेले चार स्नायपर्स काश्मीर खोऱ्यात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तानस्थित दहशतवादी गटांकडून होणारे असे हल्ले हाणून पाडण्यासाठी आपले डावपेच नव्याने आखणे सुरक्षा यंत्रणांना भाग पडत आहे.
पुलवामातील नेवा येथे १८ सप्टेंबरला झालेल्या अशा प्रकारच्या पहिल्या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान जखमी झाला. हा तुरळक हल्ला असावा असे सुरक्षा अधिकाऱ्यांना वाटले, मात्र अलीकडच्या काही छुप्या हल्ल्यांमध्ये त्राल येथे सशस्त्र सीमा बलाच्या व एका लष्करी जवानाचा, तसेच नौगाम येथे सीआयएसएफच्या जवानाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना छुप्या हल्ल्यांची कल्पना आली. सीआयएसएफचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रसाद यांच्यावर शनिवारी हल्ला झाला. चेहऱ्यावर गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला.
गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बंदी घातलेल्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या प्रत्येकी दोन सदस्य असलेल्या दोन वेगवेगळ्या ‘मित्र’ गटांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला काश्मीर खोऱ्यात प्रवेश केला असून, काही स्थानिक पाठीराख्यांच्या मदतीने त्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ात तळ ठोकला आहे.