शिवसृष्टीचा दुसरा टप्पा तयार, शिवजयंतीदिवशी होणार लोकार्पण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण
![Shivsrishti, 2nd, Phase, Ready, Shiv Jayanti, Dedication,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2025/02/shivshai-780x470.jpg)
कात्रज : महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आंबेगाव ब्रुद्रुक येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीचा दुसरा टप्पा आता पूर्णत्वास आला आहे. शिवजयंतीच्या दिवशी (ता. १९) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार उपस्थित असतील अशी माहिती प्रतिष्ठानचे मुख्य विश्वस्त जगदीश कदम यांनी आज शिवसृष्टी येथे पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर, सल्लागार संदीप जाधव व शिवसृष्टीचे व्यवस्थापक अनिल पवार उपस्थित होते.
शिवसृष्टी प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची माहिती देताना कदम म्हणाले की, या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एक भव्य स्वागत कक्ष, एखाद्या आधुनिक थीम पार्कला साजेल असे टाईम मशीन थिएटर व तुळजाभवानी मातेचे भव्य मंदिर यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज एक माणूस म्हणून कसे होते हे देखील लोकांपर्यंत पोहोचवायला हवे असे बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न होते.
हेही वाचा : सभागृहाच्या कामकाजात सातत्याने उपस्थित असाल तेव्हाच संसदीय आयुधांचा योग्य वापर शिकता येईल
त्यानुसार या टप्प्याची रचना करण्यात आली आहे. या टप्प्याच्या निर्मितीमध्ये ८७ कोटी रुपये इतकी गुंतवणूक करण्यात आली आहे. स्वदेश, स्वधर्म व स्वभाषा ही शिवाजी महाराजांना जवळची असणारी महत्वाची ३ तत्वे यावर या टप्प्याच्या निर्मितीमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आली आहेत.
मुख्य आकर्षण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिवप्रेमींना आपण सुमारे १ हजार वर्ष मागे जातो व तिथून शिवाजी महाराजांच्या काळात आल्याचे अनुभवता येणार आहेत. भव्य स्वागतकक्षात ४ टप्प्यांमध्ये निर्माण होणाऱ्या शिवसृष्टीची प्रतिकृती (मॉडेल) ठेवण्यात आले असून त्या त्या टप्प्याच्या नावासमोरील बटन दाबले असता तो टप्पा कशासंबंधी आहे व शिवसृष्टीत कुठे आहे हे शिवप्रेमींना कळेल.
या दालनामध्ये महाराजांच्या काळात काढलेल्या व सध्या जगातील प्रसिद्ध संग्रहालयांमध्ये असलेल्या चित्रांच्या (पेंटिंग्ज) हाय रेझोल्युशन इमेजेसच्या प्रिंट्सचे ६ मोठे पोर्ट्रेट्स लावण्यात आले आहेत. यामुळे छत्रपती कसे दिसत असतील याचा काहीसा अंदाज शिवप्रेमींना येऊ शकतो, असेही कदम म्हणाले.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महाराजांनी आपल्या हयातीत केलेल्या लढायांची माहिती येथे लिखित स्वरूपात मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन भाषांमध्ये देण्यात आली आहे. तसेच, महाराजांच्या घराण्याचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी मातेचे मंदिर या टप्प्यात साकारण्यात आले आहे व आता शिवसृष्टी पाहण्यासाठी येणाऱ्या शिवप्रेमींना दर्शनासाठी खुले असणार आहे. सदर मंदिर हे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराची तंतोतंत प्रतिकृती असून अगदी बांधकामात वापरण्यात आलेला दगडदेखील सारखा आहे.
– जगदीश कदम, मुख्य विश्वस्त, महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान