चऱ्होली, हिंजवडीतून ९५ ई-बस धावणार; पीएमपीएमएलची माहिती

पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडकडून (पीएमपीएमएल) चऱ्होली आणि हिंजवडी फेज दोन येथे ई बस डेपो होणार आहे. यामधून ९५ ई बस सोडण्याचे नियोजन प्राथमिक टप्प्यात आहे. या ठिकाणी लवकरच ई-बस डेपो कार्यान्वित होणार आहे. या बस सुरू झाल्यास दोन्ही भागातील नागरिकांची गैरसोय देखील दूर होणार आहे.
चऱ्होली आणि हिंजवडी फेज-२ येथे डेपो झाल्यास ई-डेपोंची संख्या सात होणार आहे. नवीन सुरू करण्यात येणाऱ्या ई-बस डेपोमधून शंभर ई-बस सोडण्यासाठी मार्गाचे व कर्मचाऱ्यांचे नियोजन करण्याचे काम पीएमपीएमएलकडून सुरू करण्यात येत आहे.
शहरातील कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आणि हरित ऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी पीएमपीएमएलकडून ताफ्यात पर्यायी इंधनावरील बस वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानुसार ताफ्यात सीएनजी व ई-बस वाढविण्यावर भर दिला जात आहे.
हेही वाचा : भारत वि. इंग्लंड चौथी टी-२० लढत आज पुण्यात रंगणार; जाणून घ्या कधी व किती वाजता
पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बसची अधिक संख्या दाखल होणार आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना देखील त्याचा फायदा होणार आहे. पीएमपीएमएलच्या ताफ्यात टप्प्याटप्प्याने नवीन ६५० ई-बस दाखल होणार होत्या.
मात्र, चऱ्होली आणि हिंजवडी फेज २ ई-बस डेपोंचे काम एक ते दीड वर्षांपासून रखडले होते. त्यामुळे पीएमपीएमएलच्या ताफ्यात ई-बस दाखल होण्यास उशीर झाला. आता दोन्ही ई-डेपोंचे काम पूर्ण झाले असून, लवकरच येथून नवीन ई-बसची सेवा सुरू करण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
चऱ्होली आणि हिंजवडी फेज २ या ठिकाणचे ई-डेपो लवकरच सुरू केले जणार आहेत. या डेपोतून अनुक्रमे ३५ आणि ६० ई-बस सोडण्याचे नियोजन आहे. या बस कोणत्या मार्गावर सोडायच्या, याचे नियोजन सुरू करण्यात येत आहे.
– सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल





