स्टंटबाजी पडली महागात; व्हायरल झाला व्हिडिओ अन् अडकले पोलिसांच्या जाळ्यात

बारामती: शहरातील एमआयडीसी परिसरात बेफाम चालविलेल्या दोन स्टंट कारच्या व्हायरल व्हिडीओने नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला. हे व्हिडीओ थेट वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यापर्यंत पोहचले. मग काय? या वाहनांचा शोध घेत अखेर या स्टंटबाजांना बारामती पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला.
याप्रकरणी पोलिसांनी मयूर आव्हाड आणि तेजस मनोज कांबळे या स्टंटबाजांविरोधात बेदरकारपणे वाहन चालविल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामती एमआयडीसीतील पेन्सिल चौक ते गदिमा चौक या रहदारीच्या रस्त्यावर दोन चारचाकी वाहनांनी स्टंटबाजी करून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हेही वाचा – लघुउद्योजकांवर कारवाईची टांगती तलवार
त्यामध्ये एक टाटा पंच, तर दुसरी पोलो गाडी असल्याचे दिसत होते. हा स्टंट अंगलट आला असता, तर यात अनेकांना जीवही गमवावा लागला असता. या व्हिडीओने बारामतीकरांना धक्काच बसला. त्यामुळे पोलिसांनी या दोघांचा शोध घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील, वाहतूक पोलीस अंमलदार सुभाष काळे, सुधाकर जाधव, अजिंक्य कदम, योगेश कातवारे, हवालदार रावसाहेब गायकवाड, ओंकार सिताप यांनी ही कारवाई केली.
व्हायरल व्हिडीओत वाहनांचे क्रमांक अस्पष्ट दिसत असल्याने वाहतूक शाखेसाठी हे मोठे आव्हान होते. मात्र, वाहतूक शाखेने त्या वाहनांचा शोध घेतला. त्यातील एक चारचाकी दौंड तालुक्यातील असून, हा गुन्हा दि. 25 जानेवारी रोजी घडल्याचे सिद्ध झाले, तर दि. 27 रोजी टाटा पंच तसेच फोक्सवॅगन कंपनीची पोलो गाडी या वाहनचालकांवर बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर आव्हाड आणि तेजस कांबळे अशी या दोघांची नावे आहेत.





