इंग्लंड व ऑस्ट्रेलियाने फेटाळले स्पॉट फिक्सिंगचे आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/cricket-1.jpg)
इंग्लंडच्या तसेच ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) तसेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळला आहे. अल जझीरा या चॅनेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून शोधल्याचा दावा केला आहे. योग्य तो पुरावा दिल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका आयसीसीनं घेतली आहे. मात्र, स्टिंग ऑपरेशनचे फूटेज देण्यास अल जझीरानं नकार दिल्याचे वृत्त आहे. २०१० ते २०१२ दरम्यान खेळाडूंच्या एका गटानं स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.
इंग्लंडच्या खेळाडूंबरोबरच नाव न सांगता ऑस्ट्रेलिया व पाकिस्तानच्या खेळाडूंच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. अत्यंत तुटपुंजी माहिती देण्यात आली आहे, कुठल्याही प्रकारची स्पष्टता नाही असं ईसीबीनं म्हटलं आहे. इंग्लंडच्या आताच्या अथवा आधीच्या खेळाडूंच्या एकात्मतेबाबत वा वर्तणुकीबाबत कुठलाही संशय घ्यायला जागा नाही अशी नि:संदिग्ध ग्वाही ईसीबीनं दिली आहे. खेळामध्ये भ्रष्टाचार होऊ नये यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे उपलब्ध गोष्टी देण्यात आल्या आहेत आणि त्यांच्यासमवेत यावर काम करण्यात येईल आणि खेळाचा मान राखण्यात येईल असं ईसीबीनं म्हटलं आहे.
अल जझीरानं त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे द्यावेत असं आवाहनही करण्यात आलं आहे. खेळाडूंवर कुठलाही पुरावा नसताना आरोप करणं बास झालं असंही वैतागून क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे चीफ एग्झिक्युटिव्ह अॅलिस्टर निकोलसन यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या आरोपांनी खेळाडू हैराण झाल्याचे त्यांनी सांगितले.