पालिकेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगला मिळणार गती

पिंपरी: महापालिकेच्या ई-लर्निंग प्रकल्पाअंतर्गत शाळा, कार्यालयांना इंटरनेट बँडविड्थ सेवा उपलब्ध करणे, रुग्णालयामध्ये पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करणे, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश शुल्क, वसतिगृह शुल्क, प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन अदा करणे, यासह विविध विषयांना प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीने मान्यता दिली.
महापालिका स्थायी समिती आणि महासभेत आवश्यक असलेल्या विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या शाळा आणि कार्यालयांना ई-लर्निंग प्रकल्पाअंतर्गत बँडविड्थ सेवा उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा अधिकाधिक वृद्धिंगत करणे, रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता करणे, या दृष्टिकोनातून नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्स (एनबीईएमएस) नवी दिल्लीमार्फत रुग्णालयात ‘एनबीईएमएस पदविका अभ्यासक्रम’ सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
हेही वाचा – संकटात आहे सैफ, मुंबई आहे ‘सेफ’
त्यानुसार एनबीईएमएस यांच्याकडून भोसरी व थेरगाव रुग्णालय यांना उपलब्ध पायाभूत सोयी-सुविधा, मनुष्यबळ यांच्या मानांकनानुसार पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. या अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींकडून घ्यावयाचे प्रवेश शुल्क, वसतिगृह शुल्क आणि त्यांना अदा करावयाचे विद्यावेतन याबाबत विषयास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. महापालिका स्वच्छ महाराष्ट्र व भारत अभियानात दरवर्षी सहभाग घेते. त्यानुसार आयुक्त सिंह यांनी सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या दृष्टीने आढावा घेतला. स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या अनुषंगाने शहरातील एकूण सार्वजनिक शौचालयांपैकी ज्यांचा अजिबात वापर होत नाही, जे शौचालय दुरावस्थेत आहेत. मोडकळीस आले आहेत त्यांचे सर्वेक्षण करून त्यांना निष्कासित करण्याचे ठरले होते. त्यानुसार शौचालय निष्कासनासाठी येणाऱ्या खर्चास प्रशासक सिंह यांनी मान्यता दिली.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा :
मोरवाडी स्मशानभूमी येथे पर्यावरणपूरक वायुप्रदूषण नियंत्रक यंत्रणा बसवणे, महापालिकेच्या ब,फ,ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत विविध ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, महापालिकेच्या मुख्य इमारत, एलबीटी कोठारे, क्षेत्रीय कार्यालये, करसंकलन कार्यालये, स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका अशा ठिकाणी डास, माश्या, ढेकूण, झुरळ, उंदीर, घुशी इत्यादींचा उपद्रव होऊ नये आणि त्यावर नियंत्रण आणण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने औषध फवारणी करणे, अशा विविध विषयांना प्रशासक सिंह यांनी बैठकीत मान्यता दिली.





