ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावकारी जाचाला कंटाळून कुटुंबाचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

मुलाचा खून करून पती-पत्नीचा गळफास, पत्नीचा मृत्यू, पती बचावले तिघे गजाआड

पिंपरी : व्याजाने घेतलेल्या पैशांची परतफेड करून आणि जमीन लिहून दिल्यानंतरही वाढीव पैशांसाठी सावकारांनी तगादा लावल्याने एकाच कुटुंबातील तिघांनी झाेपेच्या गाेळ्या खात आत्महत्येचा प्रयत्न केला. वडिलांनी मुलाचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेतला. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. तर, पती बचावले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी (दि.17) रात्री साडेनऊच्या सुमारास चिखलीत घडली. याप्रकरणी पाेलिसांनी तीन सावकारांना गजाआड केले आहे.

धनराज वैभव हांडे (वय 10) असे खून झालेल्या मुलाचे, शितल वैभव हांडे (वय-41) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. बचावलेले महिलेचे पती वैभव मधुकर हांडे (वय -50, सर्व रा. सोनावणे वस्ती, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष पांडुरंग कदम (वय 48, रा. ताथवडे), संतोष दत्तात्रय
पवार (वय 49, रा. कुदळवाडी, चिखली) आणि जावेद मेहबूब शेख (वय-36,रा. मोई, ता. खेड, जि. पुणे) यांना अटक केली आहे. तर, वैभव यांच्या विरोधात मुलाच्या खूना प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत चिखली पाेलीस ठाण्याचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी माहिती दिली. आरोपी संतोष कदम याच्याकडून फिर्यादी यांनी व्यावसायासाठी सहा लाख, संताेष पवारकडून दाेन लाख रुपये 10 टक्के दरमहा व्याजाने घेतले होते. आरोपी जावेद शेख याच्याकडून चार लाख रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादी यांनी आरोपी संतोष कदमला रकमेची परतफेड म्हणून 9 लाख 50 हजार रुपये दिले. तसेच फिर्यादी यांच्या नावावर असलेली एक एकर जमीनही लिहून दिली होती.

आराेपी संताेष पवारला व्याजाची दरमहा 20 हजार रुपये देऊन स्वतःच्या मालकीची 20 गुंठे जमीन लिहून दिली होती. त्यानंतरही पवारने 14 लाख रुपये दिल्याशिवाय जमीन परत देणार नाही, असा तगादा लावला. आरोपी जावेद शेख याने दिलेल्या कर्जापोटी व्याज म्हणून चार लाख 50 हजार रुपये दिले. त्यानंतरही आरोपींनी व्याजाचे पैसे देण्यासाठी हांडे यांच्याकडे तगादा लावला. फिर्यादी हांडे यांना शिवीगाळ व दमदाटी करून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. सावकारांच्या या त्रासाला कंटाळून त्यांनी सामुहिक आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्याच मेडिकलमधून झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हांडे यांनी मुलगा धनराज यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर पती-पत्नीने छताच्या पंख्याला गळफास घेतला. यात पत्नी शितल यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चिखली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वैभव हे जिवंत असल्याचे दिसून येताच त्यांना त्वरीत त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचे प्राण वाचले. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.

भावाला पाठविली चिट्टी
शितल यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ठाण्याला राहणारा भाऊ अमित गाढवेला मोबाइलवर सुसाइड नोट (चिट्टी) पाठविली होती. भावाने चिट्टी पाहताच चिखली पोलिसांना दूरध्वनी केला. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता धनराज खाटेवर पडला होता. तर, शितल आणि वैभव लटकलेल्या अवस्थेत होते. दोघांनाही खाली उतरवले असता वैभव यांचा श्वास चालू होता. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी तीन सावकारांना अटक केली आहे. फिर्यादीच्या विरोधात मुलाच्या खूनाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– डॉ. शिवाजी पवार,
पोलीस उपायुक्त.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button