Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

To The Point : राष्ट्रवादीचे विलास लांडे-अजित गव्हाणे यांची रणनिती ‘‘आवळा द्या अन्‌ कोहळा काढा’’!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पुन्हा जुळवून घेणार! : आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी आता मोर्चेबांधणी

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील ‘चाणक्य’ माजी आमदार विलास लांडे आणि त्यांचे शिष्य अजित गव्हाणे यांनी आगामी महानगरपालिका निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून सत्तेत सहभागी होण्याची ही रणनिती आहे. मात्र, यामुळे स्थानिक पातळीवर भाजपा आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडणार, असे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार केला, असा दावा केला जातो. या निवडणुकीत महाविकास आघाडी पर्यायाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला चांगले यश मिळाले होते. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांनी समर्थकांसह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकला आणि शरद पवारांशी हातमिळवणी केली होती.

विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ‘तुतारी’ चिन्हावर भोसरीची निवडणूक लांडे आणि गव्हाणे यांनी प्रतिष्ठेची आणि अतितटीची केली. मात्र, भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि वर्चस्व कायम ठेवले. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांच्यासह त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत दाखल झालेल्या २० ते २५ समर्थक माजी नगरसेवकांची मोठी राजकीय कोंडी झाली.

विलास लांडे- अजित गव्हाणे यांच्या प्रवेशाला होता विरोध..

वास्तविक, शरद पवार गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा लांडे-गव्हाणे यांच्या प्रवेशाला विरोध होता. किंबहुना, त्यांच्या प्रवेशामुळे अनेक निष्ठावंताची अस्वस्थता वाढली होती. सत्तेसाठी आणि तिकीटासाठीच लांडे-गव्हाणे यांनी प्रवेश केला, असा सूर होता. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार रोहीत पवार असे दोन गट राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. त्यातच खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार अमोल कोल्हे यांचीही मनधरणी करावी लागते. त्यामुळे लांडे-गव्हाणे यांची राष्ट्रवादी शरद पवार गटात घुसमट सुरू होती. माजी आमदार विलास लांडे यांनी आगामी राजकीय वाटचालीबाबत नुकतेच एका आघाडीच्या वृत्तवाहिनीला ‘बाईट’ दिली. त्यामध्ये त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याबाबत अजित गव्हाणे यांनाही सूचना केल्याचे म्हटले आहे.

सत्तेसाठीच पुन्हा अजित पवारांशी जवळीक..!

विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोठे यश मिळवले. भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात संधी नाही. त्यामुळे विलास लांडे आणि अजित गव्हाणे यांनी ‘‘पवार कुटुंबियांशी निष्ठा’’ हे सूत्र पुढे केले आणि अजित पवारांशी जवळीक साधण्यासाठी तयारी केली आहे. वास्तविक, आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपा आणि आमदार महेश लांडगे यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही. महाविकास आघाडी कधीही फूट शकते. त्यामुळे समर्थक नगरसेवकांना महाविकास आघाडीत संधी देता येणार नाही. याचा अंदाज आल्यामुळेच माजी आमदार विलास लांडे यांनी अजित पवार आणि पवार कुटुंबियांबाबत साखरपेरणी सुरू केली आहे, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

अजित गव्हाणे समर्थकांना प्रवेशासाठी ‘ग्रीन सिग्नल’

महायुतीमधील घटकपक्ष आगामी महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, असे संकेत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षात स्थान मिळवण्यासाठी माजी आमदार विलास लांडे आणि अजित गव्हाणे इच्छुक आहेत. त्यासाठी अजित पवार यांच्यासोबत संवाद झाला असून, ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांच्या विरोधात उमेदवारी घेणे आणि महायुतीविरोधात प्रचार करण्याची भूमिका लांडे-गाव्हाणे या नेत्यांनी घेतली. आता अजित पवारांच्या बोटाला धरुन महायुतीमध्ये सत्तेतील वाटा मिळवण्यासाठी अजित पवारांबाबत गुणगाण करण्याची भूमिका म्हणजे ‘‘आवळा द्या अन्‌ कोहळा काढा’’ असा प्रकार आहे. म्हणजेच राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अजित पवारांचे गुणगाण गाणे आणि त्याद्वारे महापालिका निवडणुकीत स्थान बळकट करण्याची ही रणनिती आहे. त्यामुळे महायुतीविरोधात काम करणाऱ्यांना अजित पवार यांनी खतपाणी घातल्यास शहरात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अशी स्थानिक वादाची ठिगणी पडणार आहे, असेही राजकीय जाणकारांचे निरीक्षण आहे.

हेही वाचा : ‘दिव्यांगांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी सरकार कटिबद्ध’; उपमुख्यमंत्री अजित पवार

महाईन्यूज-X फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा : 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button