केवढी ही तारांबळ, नाही पुरेसं संख्याबळ, विरोधकांची धावपळ !
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं असा काही कौल दिला आहे, की सत्ताधाऱ्यांना अपेक्षेपेक्षा जास्त बहुमत आणि विरोधकांना तोंडावर पाडल्याचं चित्र स्पष्ट आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे तसेच अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आणि पाच वर्षांसाठी त्यांची चिंता संपली. दुसरीकडं विरोधकांची अशी गोची करून टाकली, की त्यांना विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा सुखासुखी मिळणार नाही, अशी अवस्था करून टाकली आहे. महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाला 20, काँग्रेस पक्षाला 16 तर शरद पवार गटाला दहा आमदार दिल्यामुळं विरोधी पक्ष नेता कोण याचं उत्तरच मिळू शकत नाही. विरोधी आघाडीमधील तिघांमध्ये त्यामुळं सध्या तोंडी हाणामाऱ्या सुरू झाल्या आहेत. जुळवाजुळव करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जाऊन देवेंद्र फडणवीस यांना साकडे देखील घातलं ! एकूणच काय विरोधकांची प्रचंड तारांबळ उडली आहे, त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ नाही, आणि सत्ताधाऱ्यांच्या उपकाराशिवाय त्यांना तरुणोपाय नाही, हे कटू सत्य आहे.. पण सर्वांना स्वीकारायलाच हवं!
विरोधकांची दयनीय अवस्था
विरोधकांच्या या अवस्थेबाबत बोलताना माझा एक शिक्षक मित्र मिश्किलपणे सांगून गेला, की जागांचे आकडे म्हणजे परीक्षेत सगळे प्रश्न चुकले असूनही अक्षर चांगले म्हणून मिळालेले गुण आहेत, असे एकदा लक्षात घेतले की मग पुढच्या गोष्टी..! हे आकडे बघून 1985 ची लोकसभा निवडणूक सहजपणे लक्षात येते. त्या निवडणुकीत काँग्रेसचे तब्बल 404 तर विरोधी भाजपाचे केवळ दोन खासदार निवडून आले होते. त्या लोकसभेत विरोधी पक्षात सर्वाधिक जागा होत्या त्या एन. टी. रामाराव यांच्या तेलगू देसम पक्षाला ! त्या देखील होत्या फक्त 33..अखंड आंध्र प्रदेश होता त्या वेळी…भाजपाची स्थापना झाल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातील सर्वसमावेशक भाजपा करण्यासाठी गांधीवादी समाजवाद स्वीकारण्यात आला होता. अर्थातच, तो भलताच महाग पडला होता. पुढे काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांनी अयोध्येतील मंदिराचे दरवाजे उघडले आणि भाजपाला खरोखर संजीवनी मिळाली. हा संदर्भ म्हणूनच मी दिला. पण, लोकसभा निवडणुकीत फक्त दोन जागा मिळूनही भाजपा ने सपशेल लोटांगण न घालता आणि हाराकिरी न पत्करता पुन्हा नव्या जोमाने पक्षाची बांधणी सुरू केली संघटन वाढवायला आणि लढायला सुरुवात केली आणि त्यानंतर आतापर्यंत एकूण 16 वर्षे भाजपा प्रणित ‘एनडीए’ चे सरकार केंद्रात आहे, हे लक्षात घ्यायला हवं!
या उलट बरोबर काँग्रेसची अवस्था आहे. काँग्रेस पक्ष मात्र 2014 च्या 44 नंतर आता 99 वर आहे. पक्ष कसा वाढवायचा याचा कोणताही कार्यक्रम नाही. संसदेत गोंधळ घालणे, एवढा एककलमी कार्यक्रम आमचे सर्वांचे लाडके नेते राहुल यांनी आखला आहे. आता तर भगिनी मदतीला आहेत. माझ्या भावाला कोणी काही बोलायचे नाही, एवढे सांगणे बाकी आहे. वास्तविक, पराभव हे कडू औषध समजून प्राशन केलं तर आजार बरा होण्याचे पाऊल पडू शकते. पण, काँग्रेसचे वयोवृद्ध तरुण मल्लिकार्जुन खर्गे आणि तरुण म्हातारा राहुल गांधी हे औषध तोंडाजवळ आले,की हाताने ढकलून देतात. हे राष्ट्रीय पातळीवर आहे. काँग्रेस प्रणित ‘इंडी’ आघाडी नावापुरती उरली आहे. सत्ताधारी व्हायचं असेल तर आधी चांगला विरोधी पक्ष व्हायला पाहिजे. राष्ट्रीय पातळीवर जोपर्यंत काँग्रेसला चांगला विरोधी पक्ष होता येत नाही, तोपर्यंत तो सत्ताधारी होऊ शकणार नाही. इंदिरा गांधी यांच्यासारखी दिसते म्हणून प्रियंका गांधी वड्रा यांना कोणी देशाच्या नेत्या मानणार नाही. अन्य कोणताही पक्ष राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून उभा राहण्याच्या परिस्थितीत नाही, ही परिस्थिती देखील विरोधकांसाठी भयावह आहे.
विरोधकांचे नेते तोंड लपवून बसलेले
आता महाराष्ट्रात जी आकडेवारी विरोधी पक्षांची आहे, ती बघितली तर सगळे नेते वाळूत तोंड लपवून बसले आहेत असे दिसेल. ते ईव्हीएम टेंपरिंग वगैरे फार काळ चालणारे नाही. आता पराभव झाला आहे, हे मान्य करुन महाराष्ट्रात मुख्य विरोधी पक्ष म्हणून कोण पुढे येणार हा अभ्यासाचा विषय आहे. कदाचित उद्धव ठाकरे गटा ला 20 जागा आहेत, म्हणून विरोधी पक्षनेता हे पद आणि बंगला द्या,अशी मागणी होऊ शकते. कदाचित कोणी न्यायालयात देखील जाईल. पण विरोधी पक्ष होण्यासाठी आधी संघटनात्मक कामाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शिवसेना एकत्र असताना एक चांगला विरोधी पक्ष असा आभास तरी होता, तर अखंड राष्ट्रवादी काँग्रेस बहुधा सत्ताधारी बाजूला जात असल्यामुळे विरोधी पक्ष म्हणून त्यांना कोणी मानत नव्हते. काँग्रेस पक्षाची अशीच परिस्थिती आहे.2014 पर्यंत सलग 15 वर्षे सत्ता मिळाल्याने आणि आम्ही फक्त सत्ताधारी होण्यासाठी जन्माला आलो आहोत, की काँग्रेसी मानसिकता असल्यामुळे महाराष्ट्रात विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला कितपत भवितव्य आहे, हा मोठा प्रश्न आहे. थोडक्यात सध्या 20,16, 10 या आकड्यांमध्ये गुरफटलेले तीन पक्ष महाआघाडी म्हणून लोकांपुढे येतील,ही शक्यता बरीच कमी आहे किंबहुना अशक्यच वाटते.
शाळेच्या प्रगतीपुस्तकात असलेले लाल शेरे कोणी कोणाला दाखवत नाही. इथे तर जाहीर निकाल आहे. फरक एवढाच की तिघांना 10 ते 20 या श्रेणीत जागा मिळाल्याने निवडणुकीचा पेपर तसा तिघांनाही अवघड गेलेला आहे. फक्त पहिल्यापासून तयारी कोण सुरु करणार, हा प्रश्न आहे. शाळेत आजकाल गुण देत नाहीत, पण ज्या काळात देत असत त्या काळात कमी गुण मिळाले की, मास्तर खडूस आहेत, असे पोरं आईबापाला सांगत असे , आणि त्यांना देखील ते पटायचे. इथे निवडणूक आयोगाला मास्तर समजून शिव्या देण्याचा आनंद काही काळ घेतला, की मग,महाराष्ट्रात कोण विरोधी पक्ष होणार आणि नेमके काय करणार, हे लक्षात येईल. पण गेली पाच वर्षे सुरु असलेली बडबड आता ऐकण्याची कोणाची तयारी नाही.
शहाणपण कधी शिकणार ?
विधानसभा निवडणुकीत एवढी उलथा पालथ होऊन त्यातून कोणीही शिकले नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे गट हा पूर्णपणे संजय राऊत यांच्या हातात गेला असल्यामुळे रोजची शिवीगाळ आणि बुडत्याचा पाय खोलात, अशी त्यांची अवस्था आहे. काँग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात शिवाय अधून मधून यशोमती ठाकूर यांचे खटके उडत आहेत. पक्ष असलेल्या शरद पवार गटात आता पुढाकार कोणी घ्यायचा हा प्रश्न आहे. शरद पवार हे 85 वर्षाचे आहेत आणि पुढील निवडणुकीपर्यंत त्यांची शारीरिक क्षमता किती असणार हा ही प्रश्न आहे. मुख्य म्हणजे त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपच्या उंबरठ्यावर उभे असून कोणत्याही क्षणी ते भाजपामध्ये उडी मारतील अशी अवस्था आहे. म्हणजेच त्यांची सर्वांचीच अवस्था, खेड्यात म्हणतात तशी झाली आहे उघडं नागड्यापाशी गेलं..रात्रभर काकडून मेलं..अशी झाली आहे. विरोधी पक्षांची फारच वाईट अवस्था असून सध्या सगळ्यांना व्हेंटिलेटर लावला आहे, पण ऑक्सिजन संपत आलेला आहे, आणि हे त्यांच्याही लक्षात आलेले आहे, दुसरे काय ?





