अयोध्येतील राम मंदिराबाबत समाजाच्या संयमाची परीक्षा घेणे देशहिताचे नाही – मोहन भागवत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/rss_bhagwat-1.jpg)
RSS Dussehra Utsav : अयोध्येमध्ये राम मंदिर होते हे सिद्ध झाले असून न्यायिक प्रक्रियेत नवनवीन शंका उपस्थित करुन मंदिराच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न काही लोकांकडून केले जात आहेत. त्यामुळे आता समाजाच्या संयमाची परीक्षा घेणे देशाच्या हिताचे नाही. जागेच्या हक्कासंदर्भात निर्णय व्हायला पाहिजे. तसेच सरकारने आवश्यक कायदे तयार करुन राम मंदिराच्या बांधकामाचा मार्ग प्रशस्त केला पाहिजे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.
नागपूरमधील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी संबोधित केले. भागवत राम मंदिराबाबत म्हणाले की, अयोध्येतील रामजन्मभूमीवर राम मंदिर व्हावे, अशी कोट्यवधी भारतीयांची इच्छा आहे. संघाचाही याला पाठिंबा आहे. अयोध्येत राम मंदिर होते. हे सिद्ध झाले असूनही अद्याप राम मंदिराच्या कामाला सुरुवात झालेली नाही. न्यायालयात यासंदर्भात नवनवीन दावे करुन मंदिराच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशातील काही जण यावरुन कट्टरतावादी आणि जातीय राजकारण करुन स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहे. अशा षडयंत्रानंतरही राम मंदिराच्या वादावर तातडीने तोडगा काढणे गरजेचे आहे, असेही भागवतांनी सांगितले. राम मंदिर झाल्याने देशात सद्भावना आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण होईल, असा दावाही त्यांनी केला. कौटुंबिक वाद, जवळच्या व्यक्तीनेच बलात्कार करणे, आत्महत्या तसेच जातीय वादाच्या घटना देशात वेदनादायी आहे. समाजात प्रेम आणि एकोप्याची भावना निर्माण करणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. आपली ओळख हिंदू असून सर्वांचा आदर आणि स्वीकार तसेच सर्वांचे भले करावे, हे यातून शिकतो, असे त्यांनी म्हटले आहे.