राज्यात थंडीचा जोर कायम!
पुणे, नागपूरमध्ये पारा घसरला, हवामान विभागाचा ‘अलर्ट’
पुणे : संपूर्ण राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. किमान तापमानात घट झाल्याने राज्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बोचरी थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे तर नागपूरमध्ये 14 डिसेंबर रोजी शीतलहर असल्याचे पाहायला मिळालं. 20 डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात गारठा कायम राहणार आहे. त्यानंतर मात्र राज्याच्या तुरुळक भागांमध्ये हलक्यासरी तसेच ढगाळ हवामान पाहायला मिळू शकतं. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः निरभ्र आकाश राहील. मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढे राहील. राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत मुंबईतील कमाल तापमानामध्ये वाढ पाहायला मिळत आहे. तर किमान तापमान मात्र स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील आणखी एक प्रमुख शहर असलेल्या पुणे शहरामध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहून काहीस धूक असेल. तर पुण्यातील कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे केवळ 10 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मराठवाड्यात काय परिस्थिती?
मराठवाड्यातील प्रमुख शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहील तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये बोचरी थंडी जाणवण्यास सुरुवात झाली आहे. राज्याची उपराजधानी असलेली नागपूर थंडीने गारठले आहे. 14 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये शीतलहर पाहायला मिळाली तर पुढील काही दिवस देखील विदर्भातील तापमान हे कमीच राहणार असून थंडीचा कडाका कायम राहणार आहे. 15 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढे राहील.
उत्तर महाराष्ट्रातही थंडीची झालर..
उत्तर महाराष्ट्रातही दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगलीच थंडी जाणवत आहे. नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकंदरीत 20 डिसेंबरपर्यंत संपूर्ण राज्यात कोरड हवामान आणि कडाक्याची थंडी जाणवणार आहे. त्यानंतर मात्र राज्यातील किमान तापमानात वाढ होणार आहे.



