राज ठाकरेंच्या बनावट पत्राप्रकरणी मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/11/पुणे.-29-780x470.jpg)
मुंबई : आज राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठीचे मतदान पार पडले. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी मारहाण, बोगस मतदान, शिवीगाळ यांसारख्या अनेक घटना घडल्या. मात्र वरळी मतदारसंघात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाचे बनावटपत्र वायरल झाले असून त्यात राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात धनुष्यबाणाला समर्थन दिल्याचे नमुद करण्यात आले होते.गंभीर बाब म्हणजे या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी होती. या प्रकरणी आता मनसे कार्यकर्त्यांच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांच्या नावाने एक बनावट पत्र वायरल झाले. या पत्रावर राज ठाकरे यांची बनावट स्वाक्षरी असून त्यांनी वरळीत शिवसेनेचे (शिंदे) उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला असल्याचा दावा या पत्राद्वारे करण्यात आला होता. यावरून मनसे आणि शिवसेनेच्या (शिंदे) पदाधिकारी व कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाद झाला होता.
हेही वाचा – एक्झिट पोल्सच्या अंदाजानंतर ठाकरे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले..
आपण विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. शिवडी मतदारसंघात महायुतीने मनसे विरोधात उमेदवार न देऊन मनसेचा सन्मान केला आहे आणि त्याचे दायित्त्व म्हणून हिंदू मतांचे विभाजन टाळण्यासाठी मी वरळीत धनुष्यबाणाला पाठींबा देऊन शिवसेनेला (शिंदे) समर्थन देणार आहे.
आपल्या मताचा सन्मान करा आणि विकसीत महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या. 20 नोव्हेंबरला प्रत्येकाला घराबाहेर पडून मोठ्या संख्यने मतदानाचा हक्का बजावायचा आहे. आपले प्रत्येक मत अनमोल आहे, असे या पत्रात नमुद करण्यात आले आहे. तसेच पत्राच्या शेवटी राज ठाकरेंची सहीदेखील करण्यात आली आहे.
मनसेचे उपविभाग सचिव अक्रुर पाटकर यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३३६(२), ३३६(४), ३५३(२) व १७१(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी राजेश कुसळे यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.