‘लाडक्या बहिणींना २५ लाख देणार’; अभिजित बिचुकलेंची घोषणा

Abhijit Bichukle | राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यातच बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी देखील आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये त्यांनी महिलांना २५ लाख रूपये १ टक्के व्याजाने देणार अशी योजना आणणार असल्याची घोषणा केली आहे.
अभिजीत बिचकुले हा अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे. आज त्याने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी त्याने लाडकी बहिण योजनेपेक्षाही भारी योजना आणणार असं जाहीर केलं. फक्त १५०० रुपये देऊन काही होणार नाही. आमदार म्हणून जर निवडून आलो तर प्रत्येक महिलेला २५ लाख रुपयांचं कर्ज महिलांना देणार आहे. ज्या महिला छोटी-मोठी कामं करतात, जसं भाकरी तयार करतात, हॉटेल चालवतात, अशा महिलांना २५ लाख रुपये १ टक्का व्याजाने कर्ज देणार अशी योजना आणणार आहे, अशी घोषणा बिचुकले यांनी केली.
हेही वाचा – कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या घरोघरी संपर्काला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
मटणासाठी दारूसाठी मिंदे होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराजांचा मी वैचारिक वारसदार आहे. साताऱ्यात दोन्ही राजे बंदुका काढुन सातारकरांना स्तब्ध करतात. मात्र स्वत:च्या गरजेला दोन्ही राजे भांडण मिटवून दोन्ही राजे पप्पी-झप्पी घेतात. उदयनराजे आणि शिवेंद्रराजे माझे गुरू भाऊच आहेत. मी दोन्ही राजेंचं नाक दाबतोय कारण हे दोघे देवेंद्र फडणवीस यांच्या भ्रष्टाचारी भाजपसोबत आहेत, असं बिचुकले म्हणाले.
महाराष्ट्राचा बाप हे छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत. राजकारणी घाणेरड्या पद्धतीनं एकमेकांवर टिका करतात. फक्त विरोधकच्या बॅग चेक होत असतील तर उद्धव ठाकरेंनी पुरावे द्यावेत. निवडणुका पैशांवरच सुरू आहेत, असंही अभिजित बिचुकले म्हणाले.




