शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजपचा मनसेला पाठिंबा

मुंबई | शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पाठिंबा दिला आहे. शिवडीत मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना आपला पाठिंबा असल्याचं मुंबई भाजपाचे अध्यक्ष व आमदार आशिष शेलार यांनी जाहीर केलं आहे. तुम्ही मनसेचं इंजिन हे निवडणूक चिन्ह घराघरांत पोहोचवावं. मनसेसाठी, बाळा नांदगावकर यांच्यासाठी कंबर कसून प्रचार करा, असं आशिष शेलार म्हणाले.
आशिष शेलार म्हणाले, की मनसेला आमचा पाठिंबा हा महाराष्ट्रात नाही तर केवळ शिवडी मतदारसंघापुरता मर्यादीत आहे. आपण इथं खूप वेळापासून बसलेला आहात. पाणी देखील नाही. आपणही विरोधकांना इथं पाणी पाजल्याशिवाय शांत बसायचं नाही. आज शिवडीतील जनतेसमोर आपल्या भूमिकेबद्दल खुलासा झाला पाहिजे. शिवडी विधानसभेच्या जागेवर महायुतीचा उमेदवार द्यायचा होता. पण इथे आपला उमेदवार नाही. आपले मुंबईतील ३६ पैकी ३५ ठिकाणी उमेदवार आहेत. इथे उबाठा आणि मनसेचे उमेदवार आहेत. मग आपण काय करायचं? मतदान करणाऱ्या सर्वांच्या डोक्यात सुरु आहे.
हेही वाचा – ‘लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये मिळणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी, महिलांची पोलीस भरती’
ज्यांना या विधानसभेचा अभ्यास करायचा असेल तर त्यांनी २०१४ आणि २०१७ चा अभ्यास करायला पाहिजे. त्यात आम्ही १० दिवसात अनेक मत घेऊ शकलो. नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील आपण यश घेतलं. आताही भाजपा जी भूमिका घेईल त्यातच यश निश्चित आहे. आम्हाला सर्व विचारत आहेत, साहेब एकदा भूमिका सांगा. गावाकडे लग्न सुरु आहे आणि आम्हाला नाचता येईना. एका अपक्ष उमेदवार सोशल मीडियावर भाजपचे समर्थन आहे, असं दाखवत होता. त्याला आपला पाठिंबा नाही, परस्पर भूमिका घेतली. पण अरे बाबा तू बोलशील की नाही? कोणतीही चर्चा न करता पक्षाची भूमिका कशी देणार? अपक्ष उमेदवाराला पाठिंबा नाही, असं आशिष शेलार म्हणाले.
मी आता फक्त शिवडीपुरता बोलत आहे. ते राज्यभर घेऊन जाऊ नका. मी माहीमबद्दल बोललो आणि महाराष्ट्रभर घेऊन गेले. आता भूमिका केवळ शिवडीपुरता मर्यादीत असेल. एक तर अजय चौधरी नाहीतर, बाळा नांदगावकर आणखी काही पर्याय तर नाहीत. नोटा आपला विषय नाही. हा लोकशाहीचा उत्सव आहे. विचारधारेवर आपल्याला पुढे चालायचं आहे. काही जुने मित्र आहेत. त्यांनी आपल्याला संपर्क केला नाही. पण उद्धवजी तुम्ही दगाबाजी केलीत. महाराष्ट्राच्या इतिहासात दगाबाज म्हणून नोंद ठेवायची तर उद्धवजी तुमचं नाव पहिले येईल, असंही आशिष शेलार म्हणाले.





