पीएमआरडीएच्या गृहप्रकल्प योजनेस प्रतिसाद

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 12 (चिखली) येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील 661 सदनिका आणि वाल्हेकरवाडी, पेठ क्रमांक 30 व 32 येथील 676 सदनिकांसाठी ऑनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या पाच दिवसांमध्ये त्यासाठी 907 नागरिकांनी अर्ज केले आहेत.शनिवारी (दि. 12) दसर्याच्या मुहूर्तापासून ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. 12 नोव्हेबरपर्यंत ही मुदत आहे. पेठ क्रमांक 12 येथे पीएमआरडीएच्या वतीने पहिल्या टप्प्यात एकूण 4 हजार 883 सदनिका उभारलेल्या आहेत.
त्यातील शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी ऑनलाईन सोडत काढली जाणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी 47 वन बीएचके आणि अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी 614 टू बीएचके सदनिकांचे वितरण केले जाणार आहे.वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पातील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 347 वन आरके सदनिका आणि एलआयजी प्रवर्गातील 329 सदनिका अशा एकूण 1337 शिल्लक सदनिकांसाठी सोडतीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.
हेही वाचा – CAA बाबत सुप्रीम कोर्टात निकाल, कलम 6A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय
सेक्टर 12 मधील एलआयजी प्रवर्गातील 59.27 चौरस मीटर क्षेत्राच्या टू बीएचके सदनिकांची किंमत 35 लाख 57 हजार 200 रुपये इतकी निश्चित केलेली आहे. वाल्हेकरवाडी येथील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 25.52 चौरस मीटर क्षेत्राच्या वन आरके सदनिकांची किंमत 20 लाख 90 हजार 771 इतकी आहे. अल्प उत्पन्न गटाच्या 34.57 चौरस मीटर क्षेत्राच्या वन बीएचके सदनिकांची किंमत 28 लाख 32 हजार 208 रुपये इतकी निश्चित केलेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पेठ क्रमांक 12 येथील पंतप्रधान आवास योजनेतील ईडब्ल्यूएस प्रवर्गातील 29.55 चौरस मीटर क्षेत्राच्या वन बीएचके सदनिकांची किंमत 15 लाख 74 हजार 424 इतकी आहे. त्यासाठी शासनाची अडीच लाख रुपयांची सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे या घरांची किंमत कमी होणार आहे.





