‘कॉमनमॅन’ नाही तर ‘काँट्रक्टर मंत्री’; आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

मुंबई | सीएम म्हणजे लोक चीफ मिनिस्टर असं म्हणतात, पण माझ्या मते सीएम म्हणजे कॉमनमॅन असा होतो. मी कॉमनमॅन म्हणजेच सर्वसामान्य माणूस आहे. त्यामुळे मला सर्वसामान्य जनतेत जाताना कोणतीही अडचण होत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री शिंदेंच्या या विधानावरून आदित्य ठाकरे यांनी त्यांना टोला लगावला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले, की एकनाथ शिंदे हे कॉमनमॅन’ नाही तर ‘काँट्रक्टर मंत्री’ आहेत. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत अशावेळी खंजीर खूपसला, ज्यावेळी ते रुग्णालयात होते. कठीण काळात होता. त्यांचे दोन ऑपरेशन झाले होते. त्यावेळी काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिंदे गटाबाबत राग आहे. येत्या निवडणुकीत राज्यातील जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल.
हेही वाचा – उद्योजक अमर मुलचंदानी यांना जामीन; पिंपरी विधानसभेच्या राजकारणात ‘ट्विस्ट’
हिंदुत्त्व ही आमची ओळख आहे. आमचं हिंदुत्वं हे भाजपासारखं खोटं हिंदुत्व नाही. हृदयात राम आणि हाताला काम ही आमच्या हिंदुत्त्वाची व्याख्या आहे. आमचं हिंदुत्त्व कुणाच्या खाण्यावर किंवा कपडे घालण्यावर बंधणं आणत नाही. पण भाजपाचं हिंदुत्व फक्त राजकीय फायद्यासाठी आहे. ज्यावेळी बांगलादेशमधील हिंदूवर अत्याचार होतात, तेव्हा भाजपा शांत असते. इतकंच नाही तर आयसीसीने स्पर्धा आयोजित केलेली नसताही, बांगलादेशबरोबर क्रिकेट मालिका आयोजित केल्या जातात, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन प्रभू श्रीराम यांचे दर्शन घेतलं आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतरही ते दोन वेळा अयोध्येला जाऊन आले. त्यांच्याबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही मंत्रीही होते. मात्र, आम्ही कधीही त्याचं राजकारण केलं नाही. प्रभू रामांचा वापर आम्ही राजकारणासाठी कधीहीही केला नाही. पण भाजपाने बांधकाम अर्धवट असतानाही केवळ स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी मंदिराचं उद्धघाटन केलं, असंही आदित्य ठाकरे म्हणाले.





