‘टायगर अभी जिंदा है’; सुजय विखेंचा निलेश लंकेंना इशारा
![Sujay Vikhe Patil said that Tiger is still alive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/10/Sujay-Vikhe-Patil-and-Nilesh-Lanke-780x470.jpg)
Sujay Vikhe-Patil | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहिल्यानगर (अहमदनगर) मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, निलेश लंके यांनी सुजय विखे पाटील यांचा पराभव केला होता. तेव्हापासून सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आता विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. यातच सुजय विखे यांनी राहुरी मतदारसंघात एका मेळाव्यात बोलताना खासदार निलेश लंकेंना इशारा दिला आहे.
सुजय विखे म्हणाले, की मी कुठेही गेलेलो नाही. मी कुठेही लपलेलो नाही. टायगर अभी जिंदा है. त्यामुळे तुम्ही काळजी करायचं काहीही कारण नाही. असे वादळ येत असतात आणि जात असतात. स्व.बाळासाहेब विखे पाटील यांना देखील पराभव स्वीकारावा लागला. मी तर त्यांच्या १० टक्केही नव्हतो. परिस्थिती बदलली, माझा पराभव झाला. पण परिस्थिती बदलत असते. मात्र, आपण पुन्हा एकदा तेवढ्याच ताकदीने आणि तेवढ्याच उमेदीने सर्वसामान्य जनतेचे काम करत राहणार आहोत.
हेही वाचा – नवरात्रीच्या नवव्या माळेला करा कन्या पूजन; जाणून घ्या शुभ मुहूर्त..
तुम्ही माझे भाषण कधीही ऐका आणि निवडून आलेल्या व्यक्तीचे भाषण ऐका. तुम्हाला लगेच फरक जाणवेल की, निवडून आलेल्या माणसाच्या भाषणात कधीही समाजहिताचे काम आणि शेतकऱ्यांचे काम आणि जनमाणसांच्या जीवनात परिवर्तन व्हावं, अशा प्रकारचं काम कधीही ऐकायला मिळणार नाही. तर हा बोगस आहे, याला गाडू, अशा प्रकारचं भाषण ऐकायला मिळतं. मग तुम्ही (जनता) कसे मतदान देता? आता मी आज याठिकाणी आलो आहे, या ठिकाणी जमलेल्या माणसातील अर्ध्या लोकांनी माझा कार्यक्रम केला. मात्र, मी तुम्हाला सांगतो, माझा कार्यक्रम झाला नाही तर तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीचा कार्यक्रम केला, असं सुजय विखे म्हणाले.