कॉपी राइट च्या नावाखाली छापा टाकून पैसे उकळण्याचा डाव पिंपरीतील व्यापाऱ्यांच्या एकजुटीने उधळला
संघटना अध्यक्ष श्रीचंद आसवाणी आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष सिमाताई सावळेंचा पुढाकार

पिंपरी : कॉपी राइट च्या नावाखाली छापा टाकून पैसे उकळण्याचा काही अधिकाऱ्यांचा डाव पिंपरी कँम्प बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी संघटितपणे प्रतिकार करून उधळून लावला. गुरुवारी रात्री साडेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. पिंपरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्यासह महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे, माजी नगरसेवक धन्ना आसवाणी, अनिलशेठ आसवाणी यांनी त्यासाठी विशेष पुढाकार घेतला. दिवाळीच्या दरम्यान अशा प्रकारे बनावट छापे टाकून व्यापाऱ्यांना कारवाईचा डोस द्यायचा, धमकावायचे आणि पैसे उकळण्याचा हा नेहमीचा अनुभव यावेळी व्यापाऱ्यांच्या एकजुटीमुळे हाणून पडला.
सणासुदिमुळे साहित्य खरेदीसाठी पिंपरीची बाजारपेठ गजबजलेली आहे. अशा गर्दित पोलिस बंदोबस्तात चार जण कॉपी राइट रेडच्या नावाखाली एका दुकानात शिरले. आम्हाला बनावट माल असल्याची खबर लागल्याचे सांगत त्यांनी धमकावायला सुरवात केली. व्यापाऱ्यांनी वारंवार विनवणी करूनही संबंधित अधिकाऱ्यांची दमदाटी सुरूच होती. आपल्याला जे काही तपासायचे ते तपासा पण दमबाजी करू नका, असे व्यापारी कळवळून सांगत होता. छापा पडल्याची खबर चुटकिसरशी बाजारपेठेत समजली. संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी आणि धन्ना आसवाणी हे तत्काळ तिथे पोहचले आणि समजावण्याचा प्रयत्न करू लागले. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमाताई सावळे यावेळी व्यापाऱ्यांच्या बाजुने खंबीरपणे उभ्या राहिल्या. रेडला आलेल्या लोकांनी आरेरावी करत व्यापाऱ्यांना धमकावणे सुरुच ठेवल्याने सर्व व्यापारी खवळले आणि याचा निषेध करत दहा मिनीटांत पूर्ण बाजारपेठेतील दुकाने पटापट बंद झाली. व्यापाऱ्यांची एकी पाहून अधिकाऱ्यांची अक्षरशः तंतरली आणि आपल्या स्टंटबाजीचा पोलखोल होणार म्हटल्यावर पुढच्या काही मिनिटांत त्यांनी पळ काढला. कॉपी राइट साठी छापा टाकायचा असेल तर एक रितसर कार्यपध्दत आहे. त्यासाठी संबंधीत अधिकाऱ्यांनी ज्या कंपनीचा बनावट माल असल्याचा संशय आहे त्या कंपनीचा प्रतिनिधी बरोबर घेणे बंधनकारक आहे.
प्रत्यक्षात अशा प्रकारे कोणत्याही कंपनीचा प्रतिनिधी छापा मारला त्यावेळी उपस्थित नव्हता. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांनी त्याबाबत जाब विचारला असता अधिकाऱी निरुत्तर झाले. छापा टाकण्यासाठी खासगी एजन्सीचे लोक होते. अशा प्रकारे नियमबाह्य पध्दतीने छापे टाकून व्यापाऱ्यांना दमदाटी करायची आणि लाखो रुपये उकळण्याचे कारस्थान केवळ व्यापाऱ्यांनी एकजूट दाखवल्याने हाणून पाडले. श्रीचंद आसवाणी म्हणाले, कॉपी राइट साठी पोलिस बंदोबस्तात खाजगी ऐजन्सीचे लोक येतात. बनावट माल असल्याची शंका असली तर तो जप्त करून तपासणीसाठी लॅबला पाठवातात. संबंधीत कंपनीचा अधिकृत प्रतिनिधी यावेळी त्यांच्या बरोबर आवश्यक असतो. मात्र, याच संदर्भात त्यांना जाब विचारला तर ते बोलू शकले नाहीत.
दरम्यान, अशा प्रकारे कोणी विनाकारण व्यापाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतुने छापे टाकणार असेल तर आम्ही ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा श्रीचंद आसवाणी यांनी दिला आहे.
सिमाताई सावळे यांनी व्यापाऱ्यांच्या हाकेला साद देत त्या तत्काळ धावून आल्या म्हणून व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. श्रीचंद आसवाणी, धन्ना आसवाणी यांच्यासह अनिलशेठ आसवाणी, निरज चावला, सुनिल चुगवाणी, निरज चावला, प्रकाश रत्नाणी, सोनू मंगताणी, सुशिल बजाज, प्रिन्स निगम, रोमी संधू, सुरेश शर्मा, जॉनी थडाणी, विजय वाधवा, सावल तोताणी, संजय नागदेव, किशोर पहुजा आदी यावेळी व्यापाऱ्यांच्या बाजुने उभे राहिले.





