मिशन विधानसभा निवडणूक : चिंचवड विधानसभेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ‘बंड’; भाजपाचा प्रचार करणार नाही!
राष्ट्रवादीला जागा न सुटल्यास महाविकास आघाडीचा ‘ऑप्शन’

पिंपरी : राज्यात महायुतीच्या जागावाटप वरून संघर्ष सुरू असताना अजित पवारांचा बालेकिल्ला असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चिंचवड विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला न सुटल्यास महाविकास आघाडीत प्रवेश करू पण भाजपाचा प्रचार करणार नाही असा आक्रमक पवित्रा अजितदादा समर्थक नगरसेवकांनी घेतला आहे. माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, प्रशांत शितोळे, मयूर कलाटे, विनोद नढे यांनी आज चिंचवड येथे पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली.
प्रशांत शितोळे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले योगदान हे कोणीच ना करू शकत नाही. विशेषत: चिंचवड विधानसभा मतदार संघाचा झालेला सर्वांगीण विकास हा सर्वांच्या पुढे आहे. आता काहीजण या मतदारसंघावर त्यांचा हक्क सांगत आहेत. मात्र हक्क सांगून ठरत नसतो, त्यासाठी काम पण करून दाखवावे लागते. या मतदार संघाच्या निर्मितीपासून आम्ही इथल्या राजकारणात कार्यरत आहोत. शहराच्या जडणघडणीत आमचा सहभाग आहे. गेल्या २० ते २५ वर्षे आम्ही काम इथे करतो आहे. ही जागा पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. आजची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे चिंचवड विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली पाहिजे. यावेळी आम्ही नवीन चेहऱ्याला संधी देऊ आणि ही जागा जिंकून देखील आणू असा विश्वास प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – ‘एका मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली’; जयंत पाटलांचं येवल्यात मोठं विधान
प्रसंगी वेगळा विचार करुणार : मोरेश्वर भोंडवे
मोरेश्वर भोंडवे म्हणाले की, चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचीच सर्वाधिक ताकद आहे. आमच्या सोबत २० ते २५ माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच सुटावी अशी आमची आग्रही मागणी आहे. सध्या भाजपच्या विरोधात नागरिकांमध्ये नाराजीचा मोठा सूर आहे. त्याचा परिणाम निवडणुकीवर देखील होऊ शकतो. त्यामुळे ही जागा न सुटल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
चिंचवडमध्ये नवीन चेहऱ्याला संधी द्या : मयुर कलाटे
मयूर कलाटे म्हणाले की, आमच्यापैकी एक नवा चेहरा हा चिंचवड विधानसभेचा उमेदवार असणार आहे. एक दोन दिवसात हा चेहरा कोण असणार हे सर्वांसमोर येईल. नवीन उमेदवार दिला तर नाना काटे आणि भाऊसाहेब भोईर हे देखील पाठिंबा देतील. चिंचवडची जागा आम्हाला सुटली नाही तर वेगळा पर्याय खुला असेल. आम्ही अजितदादांना दुखावणार नाही. परंतु अजितदादांनी देखील ही जागा राष्ट्रवादीला सोडवून घ्यावी अशीच आमची मागणी आहे.
मतदार संघात आमची ताकद : विनोद नढे
विनोद नढे म्हणाले की, आम्ही गेल्या काही दिवसापासून या विषयावर चर्चा करत आहोत. चिंचवड मतदार संघात आमची ताकद आहे. भाजपामध्ये उमेदवारीवरून धुसफूस सुरू आहे. त्याचा फटका निवडणुकीत बसू शकतो. बरेच भाजपचे नगरसेवक देखील आमच्या उमेदवाराला पाठिंबा देतील.





