To The Point: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ‘स्टंट’ अन् महाविकास आघाडीतील माजी नगरसेवकांचे अपयश चव्हाट्यावर!
चिखली घरकूल परिसरातील समस्यांच्या मुद्यावर मविआचा ‘सेल्फ गोल’
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवडमधील चिखली घरकूल गृहनिर्माण प्रकल्पातील पायाभूत सोयी-सुविधा आणि समस्यांबाबत सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. किंबहुना, महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार या समस्यांवर फुंकर घालत आहेत. त्याद्वारे भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना ‘लक्ष्य’ केले जात आहे. पण, या मुद्यावर मविआतील इच्छुक उमेदवारांमुळे माजी नगरसेवक व तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारचे अपयश चव्हाट्यावर मांडले जात आहे.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने २००७ मध्ये जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नवीकरण योजना (JNNURM) प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू केली. या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील चिखली येथे २००९ मध्ये ६ हजार ७२० सदनिकांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. यावेळी सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून माजी आमदार विलास लांडे कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात सुरू झालेला हा प्रकल्प आजच्या स्थितीला समस्येच्या विळख्यात आहे.
दुसरीकडे, घरकूल प्रकल्प ज्या प्रभागात येतो त्या प्रभागाचे नेतृत्त्व २०१७ ते २०२२ दरम्यान महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही पक्षांच्या सत्ताकाळात ज्यांनी केले असे माजी नगरसेवक व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार आज शिवसेना ठाकरे गटामध्ये आहेत. विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेतले, असा सातत्त्याने आरोप करणारे माजी नगरसेवक संजय नेवाळे आजच्या घडीला राष्ट्रवादी शरद पवार गटात आहेत. यामधील पवार पॅनेलप्रमुख होते आणि नेवाळे मातब्बर नेते आहेत. असे असतानाही चिखली घरकूलच्या समस्या संपल्या नाहीत, ही वस्तुस्थिती आहे.
घरकुल बांधतांना नियोजनाचा अभाव..?
घरकूल प्रकल्प ज्या ठिकाणी उभारण्यात आला. त्याच्या शेजारी ‘स्पाईन रस्ता’ विकसित करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या या जागेतून पूर्वी मुरूम काढला जात असे. सदर जागा महानगरपालिकेला हस्तांतरीत करुन प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले. पण, स्पाईन रस्ता आणि घरकूल प्रकल्प यांची ‘आलाईमेंट’ व भौगोलिक रचना (चढ-उतार) याचा विचार नियोजनात झाला नाही. घरकूल प्रकल्प स्पाईन रस्त्यापेक्षा सखल भागात असल्यामुळे पावसाळ्यात या भागात पाणी साचते. तसेच, एसटीपीतून बाहेर पाण्यासाठी स्वंतत्र पाईपलाईन केली नाही आणि जी पाईपलाईन बसवली आहे ती कमी व्यासाची आहे. पुन्हा सदर पाणी हे घरकुल प्रकल्पाच्या पाईपलाईनमध्येही सोडण्यात आले आहे. परिणामी, पावसाळ्यात एसटीपी ओव्हर फ्लो झाला की त्याचे पाणी घरकूलमध्ये शिरते, ही तांत्रिक अडचण प्रकल्पा उभारल्यापासूनची आहे, आजची नाही.
अपूर्णावस्थेतील प्रकल्पाच्या सदनिकांचे राष्ट्रवादीकडून वाटप…
विशेष म्हणजे, घरकूल प्रकल्प उभारण्यात आला. सुमारे ७ हजार कुटुंब व किमान २५ हजार नागरिकांचा हा प्रकल्प आहे. पण, या ठिकाणी फक्त पाणी साचत नाही, तर इतरही अनेक समस्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने पार्किंग, गार्डन, शाळा, खेळाचे मैदान, दवाखाना, सभागृह, मार्केट, पेव्हर ब्लॉक अशा पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव होता. २००९ साली काम सुरू केलेला आणि २०१४ मध्ये अपूर्णावस्थेत असतानाही त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ‘पॉलिटिकल मायलेज’ मिळवण्यासाठी नागरिकांना राहण्यास ताबा दिला. त्यामुळे ‘प्लॅनिंग स्टेज’च्या दूरदृष्टीच्या अभावामुळे सुरूवातीपासूनच हा प्रकल्प समस्यांच्या विळख्यात आहे. याच समस्या सोशल मीडियावर ‘बाईट’ घेतल्या जात आहेत. त्या बाईटच्या आधारे ‘नॅरेटिव्ह’ केला जातो आहे. पण, यामुळे महाविकास आघाडीतील माजी नगरसेवक व तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारचे अपयश चऱ्हाट्यावर मांडले जात आहे.
आमदार महेश लांडगे यांनी घरकूलसाठी काय केले?
दोन महिन्यांपूर्वी, अतिमुसळधार पावसामुळे पाणी साचले म्हणून महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी पाण्यात उतरून ‘ब्रँडिंग’ केले होते. सोशल मीडियावर आरोपांची राळ उडवून दिली होती. आजच्या घडीला घरकुलमधील समस्यांबाबत सोशल मीडिया ट्रायल केली जात आहे. मग, आमदार महेश लांडगे यांनी या प्रकल्पासाठी काय केले? हेसुद्धा आम्ही तपासले. काँग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात सुरू झालेला आणि अपूर्णावस्थेत असलेला प्रकल्पात कोणतेही राजकीय भांडवल न करता टाऊन हॉलचे काम पूर्ण झाले आहे. खेळाचे मैदान वापरात आहे. भाजी मंडई, व्यापारी गाळे याचे वाटप झाले आहे. तसेच, दवाखानाही कार्यान्वयीत झाला आहे. आता घरकूलसाठी स्वतंत्र पोलीस ठाणेसुद्धा सुरू करण्याचे नियोजन केले. यापूर्वीच घरकूल आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी दोन स्वतंत्र पाईपलाईन टाकण्याबाबत प्रशासनाकडे प्रस्तावित केले आहे. घरकूलमधील जुनी ड्रेनेज लाईन बदलून मोठ्या व्यासाची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.






