‘भाजपने मित्र बनून शिंदे गटाच्या गळ्याला सुरी लावली’; बच्चू कडू यांची टीका

Bacchu Kadu | नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हस्तक्षेपामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाचे ४ खासदार पराभूत झाले, त्यांनी हस्तक्षेप केला नसता तर शिंदें गटाचे ४ खासदार वाढले असते, असं प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपने मित्र बनून शिंदे गटाच्या गळ्याला सुरी लावण्याचे काम केल्याची टीकाही आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
बच्चू कडू पुढे म्हणाले, संजय राऊत हे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे. तेथून फक्त ब्रेकिंग बातम्या दिल्या जातात, ते काहीच अभ्यास करत नाही. त्यांनी थोडा अभ्यास करायला हवा. दिल्लीत तिसऱ्या पक्षाचे सरकार आहे. तिथे काँग्रेस, भाजप टिकले नाही. अरविंद केजरीवाल नसते तर कदाचित तिथे भाजपची सत्ता असती. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचे सरकार आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष मजबूत होत आहे. लोक भाजप आणि कॉंग्रेसला कंटाळले आहेत. त्यांना सशक्त तिसरा पर्याय हवा आहे.
हेही वाचा – भारतीय आठवड्याला किती तास काम करतात? जगात कितवा क्रमांक? वाचा सविस्तर..
आम्ही मुख्यमंत्र्यांकडे ज्या मागण्या केल्या होत्या, त्या त्यांनी मान्य केल्या नाही. आम्ही दिलेल्या १८ मागण्यापैकी एकाही मागणीवर मुख्यमंत्री विचार केला नाही. त्यांनी आमच्या अर्ध्याजरी मागण्या पूर्ण केल्या असत्या तरी विचार करता आला असता. मी तर माझाही मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला देईल, असे स्पष्टपणे म्हटले होते. बच्चू कडू म्हणाले की, मराठा आंदोलनात ओबीसी आणि मराठा या दोन बाजू उभ्या झाल्या आहेत. दोघांचे समाधान करुन कसे आरक्षण देता येईल, याकडे सरकारने पाहिले पाहिजे. राज्य सरकारने यावर व्यवस्थित तोडगा काढला पाहिजे, असंही बच्चू कडू म्हणाले.





