Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : पिंपरीत आमदार आण्णा बनसोडे यांच्या ‘गुगली’ मुळे मविआतील तिघांची ‘विकेट’? 

पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याची चर्चा : बनसोडे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्याच्या तयारीत?

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणातील निर्णायक मतदार संघ म्हणून ओळखला जाणाऱ्या पिंपरी विधानसभा मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे. २०२८ पर्यंत हे आरक्षण कायम राहणार आहे. सध्या ज्या काही राजकीय घडामोडी समोर येत आहेत. त्यामध्ये विद्यमान आमदार आण्णा बनसोडे यांनी टाकलेली ‘‘गुगली’’ फिट बसली, तर मतदार संघातील महाविकास आघाडीतील प्रभावी दावेदार तीन उमेदवारांची ‘विकेट’ पडणार आहे. 

भाजपा महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचा विद्यमान आमदार असताना मित्र पक्ष भाजपा आणि आरपीआयने पिंपरीवर ‘क्लेम’ केला आहे. किंबहुना, ‘‘विद्यमान आमदार निवडून येणार नाहीत. त्यामुळे ही जागा एकतर आरपीआयला सोडावी किंवा मी घड्याळ चिन्हावर लढण्यास तयार आहे,’’  अशी घोषणा माजी नगरसेविका व आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी केली आहे. दुसरीकडे, भाजपा आणि आरपीआयच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच संयुक्त बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. भाजपाने पिंपरीची जागा आरपीआयला सोडण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याबाबतचा ठरावही मंजुर झाला आहे, असा दावा आरपीआयचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर यांनी केला आहे. 

या घडामोडी सुरू असतानाच आज आमदार आण्णा बनसोडे यांनी पुण्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी भोसरीतील माजी आमदार विलास लांडे हेसुद्धा उपस्थित होते. त्यामुळे आण्णा बनसोडे ‘‘तुतारी’’ हातात घेणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. मात्र, बनसोडे यांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिलेला नाही. 

राष्ट्रवादीचेसर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीबाबत प्रसारमाध्यमांध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तामधील फोटो.

आता आमदार बनसोडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला, तर या मतदार संघातून इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, ठाकरे गटाचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार आणि महाविकास आघाडीतून ठाकरे गटाकडून तीव्र इच्छुक असलेल्या माजी नगरसेविका सीमा सावळे यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारीची ‘‘विकेट’’ पडणार आहे. बनसोडे यांच्या खेळीमुळे सावळे, शिलवंत यांना ‘‘अपक्ष’’ लढण्याची तयारी ठेवावी लागेल. तसेच, ही निवडणूक बहुरंगी होईल, असे राजकीय जाणकार सांगतात. 

‘कमळ’च्या चिन्हावर ‘आरपीआय’चा उमेदवार..? भाजपाचा ‘फॉम्युला’…! 

महायुतीच्या जागावाटपामध्ये पिंपरी मतदार संघ केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासाठी सोडावा, असा आगृह धरला आहे. तसेच,  ‘आरपीआय’चा उमेदवार भाजपाच्या चिन्हावर लढवण्यास तयार आहे. त्यामुळे  आरपीआयच्या माध्यमातून भाजपाला एक मतदार संघ मिळणार असल्यामुळे स्थानिक पातळीवरील बैठकीत तसा ठरावही मंजूर केला आहे. त्यामुळे पिंपरीची निवडणूक ‘कमळ’च्या चिन्हावर ‘आरपीआय’चा उमेदवार.. अशा ‘फॉम्युला’वर होईल. २०१४ मध्ये आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी ‘कमळ’ चिन्हावर लढण्यास नकार दिला होता. त्या निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला. आता आगामी निवडणुकीत सोनकांबळे ती चूक पुन्हा करणार नाहीत. निवडणुकीला आणखी ५० ते ६० दिवसांचा कालावधी आहे. या काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे कोण-कोणत्या चिन्हावर लढणार आणि कोण अपक्ष मैदानात उतरणार… हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. परंतु, पिंपरीत बहुरंगी लढत होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button