‘अजितदादा निवडणूक लढवणार, असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत’; छगन भुजबळांचं विधान

Chhagan Bhujbal | एकदा बारामतीकराना कुणीतरी मी सोडून आमदार मिळायला हवा, असं मोठं विधान अजित पवार यांनी केलं होतं. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी एक सूचक विधान केलं आहे. अजित पवार हे आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते निवडणूक लढवणार आहेत. असं मध्येच ते शस्त्र टाकू शकत नाहीत, असं छगन भुजबळ म्हणाले.
महायुतीमधील पक्षांना जर चांगलं यश मिळवायचं असेल तर मला वाटतं महायुतीमधील नेत्यांनी एकमेकांवर कोणतेही विधान करू नये. कारण एकमेकांच्या विरोधातील विधानांमुळे विरोधी पक्षाला टीका करायला खाद्य मिळतं. शेवटी सर्वांचं लक्ष्य एकच आहे की पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणणं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वांना सूचना दिल्या आहेत. आता निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे कोणीही काहीही विधाने करू नये, असं त्यांनी सांगितलेलं आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
हेही वाचा – ‘वर्षा’ निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतले गणरायाचे दर्शन
अजित पवारांच्या विधानाबाबत बोलताना छगन भुजबळ म्हणाले, अजित पवार हे निवडणूक लढवणार आहेत. शेवटी ते आमच्या ग्रुपचे कॅप्टन आहेत. ते अशा प्रकारे मध्येच शस्त्र टाकू शकत नाहीत. मात्र, त्यांनी मांडलेली व्यथा ही काही दिवसांपूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत जे काही झालं त्याबाबत व्यथा आहे.





