‘देवेंद्र फडणवीस औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन’; संजय राऊतांचा हल्लाबोल
मुंबई | छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेवरून महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी मुंबईत रविवारी महाविकास आघाडीने (मविआ) ‘जोडे मारा’ आंदोलन केले. याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होतं अशी टीका केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलं नाही असाही दावा केला. यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी इतिहास समजून घेतला पाहिजे. भाजपाचे लोक चिंतन बैठक करतात. त्यांनी एकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास, त्यांचं शौर्य, त्यांचा संघर्ष यावर चिंतन बैठक बोलवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटलं नाही असं फडणवीस म्हणत आहेत. पण सूरतचं व्यापारी मंडळ ईस्ट इंडिया कंपनीला खंडणी देत होतं. स्वराज्याच्या विरोधात ते वागत होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्या व्यापाऱ्यांना लुटलं. कारण त्यांचे पैसे ईस्ट इंडिया कंपनीकडे जात आहेत. राष्ट्रीय हिताचा मुद्दा लक्षात घेऊन सूरतेची लूट शिवाजी महाराजांनी केली. देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास वेगळाच आहे. इतिहासाची मोडतोड करायची हेच त्यांना माहीत आहे.
हेही वाचा – सरकारच्या विरोधात दंगली का होत नाहीत? त्या झाल्या पाहिजेत; ठाकरे गटातील नेत्याचं विधान
पंडीत नेहरुंनी त्यांचं पुस्तक डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवरायांबाबत काही टिपण्णी केली आहे. पंडीत नेहरु तेव्हा तुरुंगात होते. तुरुंगातून ते पुस्तक लिहिलं. त्यानंतर पंडीत नेहरुंनी माफीही मागितली. त्यांनी हे पण सांगितलं की माझ्याकडे संदर्भ नव्हते, कारण मी तुरुंगात होतो त्यामुळे मी माफी मागतो. आता तो इतिहास शोधला जातो आहे. मला हा प्रश्न विचारायचा आहे की इतिहासात का जात आहात? शिवरायांच्या पुतळ्याबाबत बोला. तुमचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. दीपक केसरकरांनी अपमान केला. देवेंद्र फडणवीस यांनी यावर बोललं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
औरंगजेब फॅन क्लबचे चेअरमन देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांचे लोक त्या क्लबचे मेंबर्स आहेत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर ठेवत आंदोलन केलं. ते आंदोलन चिरडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलं. त्यामुळे आता औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य कोण आहेत ते सगळ्यांना कळलं आहे. तसंच शेवटच्या पेशव्यांनी पुण्यात मराठा साम्राज्य लयास नेलं आणि पुण्यातल्या शनिवार वाड्यावर सर्वात आधी ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला त्या पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत. त्याशिवाय अशी भाषा त्यांनी केलीच नसती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी आम्ही लढत आहोत. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय या घोषणा देण्यापासून रोखलं जातं आहे. पुतळा पडल्यानंतर तु्म्ही तो उभारणाऱ्यांना अटक करु शकत नाही कारण ते तुमच्या पेशवाईचे शिलेदार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
मध्य प्रदेशात कमलनाथ मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला. याची माफी काँग्रेस मागणार का? कर्नाटकात छत्रपती शिवरायांचा पुतळा तोडण्यात आला. त्याबद्दल काँग्रेस माफी मागणार का? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर याच काँग्रेसने शिकवलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली. छत्रपती शिवरायांनी सूरत लुटलीच नाही. उलट सूरतच्या लोकांनी तिथे छत्रपतींचा पुतळा बसवला आहे. तरीही काँग्रेसने शिकवण दिली की छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली. याची माफी काँग्रेस मागणार का? असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.