breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

८ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतला असा कोसळतोच कसा? राज ठाकरे

Raj Thackeray | मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फूट उंच पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी एकच्या सुमारास कोसळला. वादळी वारे आणि मुसळधार पाऊस यांमुळे हा पुतळा कोसळल्याचा दावा राज्य शासनाने केला असला, तरी या घटनेनंतर राज्यभरात शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवरून सरकारची कानउघडणी केली आहे.

राज ठाकरे यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे, त्याची तपासणी वगैरे काही केली होती का नव्हती? आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील ‘पाच पुतळ्यांवरची’ कविता आठवली. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दाम देत आहे.

हेही वाचा   –      शिवाजी महाराजांचा पुतळा कशामुळे पडला? एकनाथ शिंदेंनी सांगितलं कारण 

कुसुमाग्रजांची कविता

मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले.
ज्योतिबा म्हणाले, शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा.
शिवाजीराजे म्हणाले, मी फक्त मराठ़्यांचा.
आंबेडकर म्हणाले, मी फक्त बौद्धांचा.
टिळक उद़्गारले, मी तर फक्त चित्पावन ब्राह्मणांचा.
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान.
एकेक जातजमात तरी
तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती!

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हटलं होतं की महाराजांचं खरं स्मारक हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत. पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची आणि मग स्मारकांच्या निविदा काढायच्या, त्यातून काही मिळतंय का ते बघायचं इतकंच राहिलं आहे. या प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे आणि तसं घडलं तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो, असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button