breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

‘निर्लज्ज राजकारण’, महाराष्ट्र सरकारवर अभिनेता शशांक केतकर भडकला; म्हणाला..

Shashank Ketkar | अभिनेता शशांक केतकर नेहमीच समाजात आजूबाजूला घडणाऱ्या परिस्थितींवर भाष्य करत असतो. मुंबईतील रस्ते, स्वच्छता या मुद्द्यांवरून तर तो कायम व्यक्त होतो. आता पुन्हा एकदा शशांक भडकला आहे. मिरा भाईंदरमध्ये रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवस्था त्याने दाखवली आहे. याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत त्याने मत व्यक्त केलं आहे.

शशांक म्हणाला, नमस्कार, जय महाराष्ट्र! मी पोस्ट केलेले फोटो आणि व्हिडीओ तुम्ही पाहिले असणार याची मला खात्री आहे. जन्माष्टमीच्या निमित्ताने ही पोस्ट मुद्दाम शेअर करावीशी वाटली. आपल्या राज्यात सुरू असलेलं एकंदर निर्लज्ज राजकारण, त्यांच्यावरचं प्रेशर वगैरे या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत. पण, हे प्रेशर हँडल करून ते मार्ग काढू शकतात त्यामुळेच त्या मोठ्या हुद्द्यावर ही सगळी मोठी मंडळी बसलेली आहेत. हा प्रश्न एका चौकाचा नसून महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या-मोठ्या गावांचा, शहरांचा आणि देशातील प्रत्येक रस्त्याचा हा प्रश्न आहे.

या फोटोंमध्ये रस्त्याची जी काही अवस्था झालीये… ती पाहून मला राग आला, शरम वाटली. मला असं वाटलं की, ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. खरंतर गेल्या तीन महिन्यांपासून तो पुतळा लाल फडक्यामध्ये गुंडाळलेला आहे. त्या पुतळ्याचं अद्याप अनावरण झालेलं नाही. त्याचं अनावरण करण्यासाठी कोणत्या राजकारण्याची चिठ्ठी निघणार याची स्पर्धा चालू असेल. पण, या पुतळ्याच्या आजूबाजूच्या रस्त्याची अवस्था अशीच आहे. कोणत्याच शिवभक्ताला या रस्त्यामुळे अपघात झालेले बघवणार नाही, असं तो म्हणाला.

हेही वाचा    –    महिलांना मिळणार ५ लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या ‘लखपती दीदी’ योजना आहे तरी काय? 

जन्माष्टमीच्या निमित्ताने हा व्हिडीओ मुद्दाम टाकतोय कारण यानिमित्ताने बरेच सेलिब्रिटी येतील. या रस्त्याच्या आजूबाजूच्या परिसरात हे सेलिब्रिटी येतील, इतक्या थरांना एवढं बक्षीस अशा बऱ्याच जाहिराती लावण्यात आल्या आहेत. त्यावर कार्यकर्त्यांचे छोटे-छोटे फोटो देखील आहेत. या दिखाव्यात जो काही खर्च होतोय त्यापेक्षा आम्हाला मूलभूत सुविधा द्याव्यात. तो रस्ता, तो चौक नीट केला नाहीतर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार आहे इतकाच माझा प्रांजळ प्रश्न आहे. हा प्रश्न मी बीएमसीला, टीएमसीला आणि मीरा-भाईंदर महापालिकेला विचारतोय कारण, तो चौक फार मोठा आहे. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर हा चौक असून मीरारोडवरून आल्यास त्याची सुरुवात होते आणि बोरिवलीकडून आल्यास शेवट होतो. त्यामुळे या मोठ्या चौकाची अशी अवस्था असेल तर, त्या पुतळ्याचं लोकार्पण करायला येणारा राजकारणी जेव्हा येईल तेव्हा माझी एकच विनंती आहे की, तो रस्ता तसाच राहूदेत. त्यांच्या पाठीचं हाड मोडायला हवं, त्यांच्या गाडीचं चाक पंक्चर होऊदे आणि त्यांच्यासमोर अपघात व्हावा. आपण प्रत्येक थराला लाखभर रुपये बक्षीस देतो. पण, तेच पैसे इथे देऊन तो रस्ता दुरुस्त झाला पाहिजे. कारण, फक्त सण साजरे करणं म्हणजे देशाची संस्कृती जपणं असा होत नाही तर, देशातील रस्ते नीट असतील तरच संस्कृती जपेल आणि देशाचं नाव मोठं होईल, असं शशांकने सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button