क्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भारताचा पाकिस्तानवर चित्तथरारक विजय

पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन

महाराष्ट्र : ड्रॉप इन पिच, न्यूयॉर्कचं बेसबॉलचं मैदान, सूर्य आणि ढगांचा लपंडाव या सगळ्यात पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचं आव्हान मोडून काढत भारतीय संघाने ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत ६ धावांनी अफलातून विजय नोंदवला. भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री ८ वाजता सुरू झालेला हा सामना मध्यरात्र उलटल्यानंतरच संपला. ऋषभ पंतने साकारलेली ४२ धावांची खेळी, तीन भन्नाट झेल आणि जसप्रीत बुमराहने शिस्तबद्ध माऱ्यासह पटकावलेल्या ३ विकेट्स या विजयाचं वैशिष्ट्य ठरल्या. पाकिस्तानविरूद्धच्या या विजयासह भारताचे २ सामन्यात ४ गुण झाले आहेत. सुपर८ साठी ते आगेकूच करत आहेत. मात्र पाकिस्तानसाठी हा पराभव स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आणणारा ठरू शकतो.

भारतीय गोलंदाजांच्या अखेरच्या षटकांतील भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने रोमहर्षक विजय मिळवला आहे. टी-२० विश्वचषक २०२४ मधील भारत-पाकिस्तानच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताच्या उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन पाहायला मिळाले. न्यूयॉर्कमधील फलंदाजीसाठी अवघड असलेल्या नासाऊ काऊंटी क्रिकेट स्टेडियमच्या खेळपट्टीवर तगडी फलंदाजी फळी असलेला भारतीय संघ ११९ धावांवर ऑल आऊट झाला. बुमराहच्या १५व्या षटकापासून गोलंदाजांनी पाकिस्तानला एकही मोठा फटका खेळण्याची संधी दिली नाही. तर बुमराहने १९व्या षटकात इफ्तिखार अहमदची विकेट घेत पाकिस्तान संघावर मोठा दवाब टाकला. तर अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगनेही विकेट घेतली. पावसाने व्यत्यय आणूनही भारत पाकिस्तान सामना हा चाहत्यांसाठी पुन्हा एकदा मोठी पर्वणी ठरली. अवघ्या ११९ धावांच्या लक्ष्याचा बचाव करत भारतीय संघाने पाकिस्तानविरूद्ध चित्तथरारक विजय मिळवला आहे. अखेरच्या ६ षटकांत पाकिस्तानला ४० धावांची गरज होती, पण भारताच्या गोलंदाजांनी इतकी भेदक गोलंदाजी केली की कोणीही समोर टिकू शकलं नाही.

भारताने दिलेल्या या १२० धावांच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ ११३ धावा करू शकला. यादरम्यान भारताच्या सर्व गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. जसप्रीत बुमराह संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकात १४ धावा देत ३ विकेट घेतले. भारताला पहिली विकेटही बुमराहने मिळवून दिली. तर हार्दिक पांड्याने २ फलंदाजांची विकेट मिळवली. दुसरीकडे अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्या खात्यात प्रत्येकी १ विकेट आली. तर मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नसली तरी त्याने ४ षटकांत १९ धावा देत चांगली गोलंदाजी केली.

पाकिस्तानची सुरूवात लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली झाली, पण भारताच्या गोलंदाजीसमोर खेळाडू मोठी धावसंख्या करू शकले नाहीत. बाबर आझम, उस्मान खान, फखर जमान हे तिन्ही फलंदाज प्रत्येकी १३ धावा करत बाद झाले. तर इमाद वसीम १५ धावा करून बाद झाला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिजवानने ४४ चेंडूत १ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा केल्या, पण तोही १५ व्या षटकात बुमराहकडून क्लीन बोल्ड झाला. याशिवाय पाकिस्तानचे इतर खेळाडू स्वस्तात बाद झाले. पाकिस्तानचा संघ १५ षटकांनंतर एकही चौकार षटकार लगावू शकला नाही. अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर एक चौकार लागला पण तोपर्यंत सामना हातातून निघून गेला होता.

या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केली. पण भारतीय संघ फक्त १९ षटके खेळत ११९ धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडियाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक धावा केल्या. ऋषभ पंतने ३१ चेंडूत ४२ धावा केल्या. तर अक्षर पटेलने २० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. तत्पूर्वी, रोहित शर्मा १३ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर पाकिस्तानकडून नसीम शाह आणि हरिस रौफ यांनी ३-३ विकेट घेतले. दुसरीकडे मोहम्मद आमिरने २ विकेट्स घेतल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button