ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

रिल्सस्टार तथा डान्सर गौतमी पाटील आणि वाद समीकरणच

गौतमी पाटील अहमदनगर कोर्टात हजर, अटी-शर्तींनुसार जामीन मंजूर

मुंबई : रिल्सस्टार तथा डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे एक समीकरणच झालं आहे. गौतमी पाटील तिच्या डान्स स्टाईलमुळे प्रसिद्ध झाली. गौतमी पाटील सोशल मीडियामुळे अल्पावधित प्रसिद्धीच्या झोतात आली. तिच्या डान्सच्या कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी होते. पण असं असलं तरीही तिच्या कार्यक्रमाला काही तरुणांकडून हुल्लडबाजी होण्याच्या घटना याआधी अनेकदा घडल्या आहेत. त्यामुळे तिच्या कार्यक्रमाला गालबोट लागलेलं बघायला मिळालं होतं. एकदा तर तिच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी झाली की काही जण जिल्हा परिषद शाळेच्या कौलांवर जावून कार्यक्रम पाहत होते. यावेळी एक जण कौलावरुन थेट जमिनीवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. तसेच एके ठिकाणी सिमेंटच्या पत्रावर तरुण उभे राहून कार्यक्रम पाहत होते. यावेळी वजन जास्त झाल्याने सिमेंटचे पत्रे तुटले होते. त्यामुळे त्यावर उभे असलेले तरुण खाली पडल्याची देखील घटना घडली आहे.

गौतमी पाटील हिच्या डान्स स्टाईलवर वारंवार अनेकांकडून टीका होत राहिली. पण गौतमी बिथरली नाही. तिने आपले कार्यक्रम सुरुच ठेवले. तिला चाहत्यांकडून तितकं प्रेमदेखील मिळालं. तिच्या कार्यक्रमाला हजारो तरुणांची गर्दी असते. पण याच गौतमी पाटीलला आज अहमदनगर कोर्टात हजर राहावं लागलं. गौतमी पाटील हिच्या काही कार्यक्रमांना प्रशासनाकडून बंदी घालण्यात आल्याच्या देखील घटना याआधी घडल्या आहेत. पण तरीदेखील आयोजकांनी कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार बघायला मिळाला होता. एकेठिकाणी तर थेट जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. या दरम्यान, अहमदनगरच्या प्रकरणामुळे गौतमीला आज कोर्टात हजर राहावं लागलं आहे.

नेमकं प्रकरण काय?
अहमदनगरमध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी असाच एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली होती. पण तरीही कार्यक्रम पार पडला होता. हाच कार्यक्रम गौतमीला भारी पडला आणि तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गौतमी पाटील हिला आज शेवटी अहमदनगर जिल्हा न्यायालयात हजर राहावं लागलं. अर्थात न्यायालयाच्या आदेशानुसार कोर्टात हजर राहणं अनिवार्य आहे. अन्यथा कोर्टाकडून वॉरंटदेखील निघू शकतं. पण तसं काही घडलं नाही. त्याआधीच गौतमी आज कोर्टात हजर झाली. न्यायमूर्तींनी तिची बाजू एकून घेत तिला अटी-शर्तींच्या आधारावर जामीन मंजूर केला.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button