‘शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा’; सदाभाऊ खोत यांची टीका
![Sadabhau Khot said that Sharad Pawar is the shakuni uncle of Maharashtra politics](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/08/Sadabhau-Khot-and-Sharad-Pawar-780x470.jpg)
Sadabhau Khot | विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जून असल्याचं ते म्हणाले. तर शरद पवार हे शकुनी मामा असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सदाभाऊ खोत म्हणाले, डोकं शांत ठेवायचं. राजकारणात एकच माणूस मोठा आहे. तो म्हणजे आपण स्वत:. राज्यात सत्तापरिवर्तन झालं. महायुतीची सत्ता आली होती. पण शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला शकुनी मामा. शकुनी मामानं डाव टाकला आणि जनतेनं निवडून दिलेलं राज्य हिरावून घेतलं गेलं. पण फार काळ त्यांना ते राज्य लाभलं नाही. पुन्हा एकदा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या साथीनं महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं. एकनाथ शिंदे हे कर्ण आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात अर्जुनाची भूमिका देवेंद्र फडणवीस बजावत आहेत.
हेही वाचा – Narali Purnima | नारळी पौर्णिमा आज! जाणून घ्या शुभ मुहूर्ताची वेळ..
एकनाथ शिंदे मागेल त्याला दान देतात. हे राज्य कसं चालवायचं याचा दूरदृष्टीपणा कुणाकडे असेल तर ते आहेत देवेंद्र फडणवीस. सगळ्यांनी त्यांना घेरलं आहे. शरद पवारांना कळलं की एकच माणूस आपल्याला छातीवर घेऊ शकतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस. म्हणून सगळे एक झाले. वेगवेगळी आंदोलनं राज्यात उभी केली गेली. १९८२ सालापासून मराठा समाज आरक्षण मागतोय. अनेक मराठा मुख्यमंत्री झाले. पण कुणीही आरक्षण दिलं नाही. पण २०१९ मध्ये पहिल्यांदा फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं. ते आरक्षण शरद पवार, उद्धव ठाकरेंनी घालवलं. पण टीका देवेंद्र फडणवीसांवर व्हायला लागल्या, असंही सदाभाऊ खोत म्हणाले.