ताज्या घडामोडीदेश-विदेश

विनेश फोगाटसह कोट्यवधी भारतीयांना मोठा धक्का

विनेश फोगाटची याचिका सीएएसनं फेटाळली, तिला रौप्य पदक मिळणार नाही

नवी दिल्ली : भारताची पैलवान विनेश फोगाट हिला मोठा धक्का बसला आहे. विनेश फोगाटनं कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निलंबित करण्यात आल्याच्या निर्णयाविरोधात धाव घेतली होती. विनेश फोगाटची याचिका कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सनं फेटाळली आहे. यामुळं विनेश फोगाटला रौप्य पदक मिळणार नाही.

विनेश फोगाटला पॅरिस ऑलिम्पिकच्या 50 किलो वजनी गटात फ्री स्टाईल कुस्ती प्रकाराच्या अंतिम फेरीतील सामन्यापूर्वी निलंबित करण्यात आलं होतं. अंतिम फेरीतपूर्वी घेण्यात आलेल्या चाचणीत विनेश फोगाटचं वजन 100 ग्रॅमनं जास्त नोंदवलं होतं. यामुळं तिला निलंबित करण्यात आलं होतं. विनेश फोगाटनं या प्रकरणी कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टसमध्ये याचिका दाखल केली होती. मात्र, इथं देखील विनेश फोगाटच्या पदरी निराशा आलेली आहे. विनेशच्या याचिकेवर 9 ऑगस्टला सुनावणी पार पडली होती.

विनेश फोगाटनं यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटातून सहभाग घेतला होता. यापूर्वी ती 53 किलो वजनी गटातून कुस्ती खेळायची. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम पंघाल त्या वजनी गटातून सहभागी झाल्यानं विनेशला वजनी गट बदलायला लागला होता. विनेश फोगाटनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना कठोर परिश्रम करुन वजन घटवलं होतं. मात्र, 2017 पासून बदलेल्या नियमांचा विनेशला फटका बसला. यापूर्वी कुस्ती स्पर्धा एका दिवसात पार पडायची. नंतर ती दोन दिवसात पार पडू लागली यामुळं पैलवानांचं वजन अंतिम फेरीपूर्वी देखील मोजलं जावू लागलं.

या बदलाचा फटका विनेश फोगाटला बसला. विनेश फोगाटनं पहिल्या दिवशी तीन सामने खेळले. यावेळी तिचं वजन बरोबर भरलं होतं. तिनं पहिल्याच मॅचमध्ये जपानच्या युई सुसाकीला पराभूत केलं. उपांत्यपूर्व फेरीत विनेश फोगाटनं यूक्रेनच्या ओकासाना लिवाचला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली होती. यानंतर विनेश फोगाटनं उपांत्य फेरीत क्यूबाच्या वाय. गुझमान लोपेझला पराभूत केलं होतं. या विजयानंतर कोट्यवधी भारतीयांना विनेश फोगाटला रौप्य किंवा सुवर्णपदक मिळणार हे निश्चित झाल्यानं आनंद झाला होता. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच विनेश फोगाटला निलंबित केल्याची बातमी समोर आली आणि कोट्यवधी भारतीयांना धक्का बसला. विनेश फोगाटनं सीएएसमध्ये धाव घेतली मात्र, तिथं देखील तिच्या पदरी निराशा आली आहे. विनेश फोगाटनं राष्ट्रकूल स्पर्धेत तीन सुवर्णपदकं जिंकली आहेत. आशियाई स्पर्धेत एकदा सुवर्ण आणि कांस्य पदकावर विनेशनं नाव कोरलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button