breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

लाडक्या बहिण योजनेचे पैसे केव्हा मिळणार? अजित पवारांनी सांगितली तारीख..

मुंबई | मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी महाराष्ट्रातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरल्याची माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. या योजनेचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी खात्यात जमा होणार असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली आहे. ते दिंडोरी येथे आयोजित केलेल्या जनसन्मान यात्रेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, उद्याच्या १९ तारखेला रक्षाबंधन आहे. मला आजच्या सभेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम माय माऊलींना, बहिणींना आणि मुलींना सांगायचं आहे की रक्षाबंधनाच्या निमित्ताने माझी लाडकी बहिण योजना तुमच्याकरता दिली आहे. संबंध महाराष्ट्रात याची चर्चा सुरू आहे. गावागावात, तांड्यावर, वाडी वस्तीवर महिलांना कळलं आहे की अशी काही योजना आली. कित्येक घरात आई स्वत:च्या पोटाला चिमटा देऊन मुलांना खाऊ घालते. स्वत:च्या आवडीला मुरड घालून आपल्या कच्चा बच्च्यांकरता करत असते. पण तिलाही वाटत असेल की आपण स्वत:करता काहीतरी करावं. अनेक प्रकारची कामं माझे महिला भगिनी करत असतात. राहणीमान बदललं असलं तरीही महिला सबलीकरण केलं पाहिजे.

हेही वाचा      –        मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड मनपामध्ये ५७५ पदांवर प्रशिक्षणाची संधी 

महिलांना मान सन्मान, प्रतिष्ठा करून देण्याचं काम महिला धोरणातून आणलं आहे. त्यांनी तयार केलेल्या वस्तूला बाजारपेठ कशी मिळेल, त्यांच्या घरात पती कमावतो, त्यांचं ऐकावं लागतं. पण त्या महिलेलाही मन आहे. तिलाही वाटतं मी ही काहीतरी करावं माझ्या मुलाबाळांकरता. परंतु इतके दिवस सर्वांनी तिथे दुर्लक्ष केलं. आम्हीही जबाबदार आहोत. त्यामुळे यावेळेस अर्थसंकल्प आणत असताना अडीच लाखांहून कमी उत्पन्न असलेल्या महिलांना दीड हजार रूपये द्यायचे. आई-बहिणींनो घाबरू नका. तुमचे अर्ज भरून घेतले जात आहेत. मी कुठेही कमी पडणार नाही. वाट्टेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, असं अजित पवार म्हणाले.

१९ तारखेला रक्षाबंधन आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे की १७ तारखेला पात्र महिलांना पैसे मिळणार. आतापर्यंत पात्र महिलांची संख्या सव्वाकोटीपर्यंत पोहोचली आहे. कदाचित ही संख्या दीड ते दोन कोटींपर्यंत जाईल, पण काही हरकत नाही. कालच मी सहा हजार कोटी रुपयांच्या फाईलवर सही करून आलो आहे. तुमच्या स्वतःकरता काही लागत असेल ते घेण्याचा प्रयत्न करा. महायुतीचं सरकारआणण्याकरता तुम्ही आम्हाला पाठबळ द्या. आम्हाला सहकार्य करा. कायम पुढे पाच वर्षे तुमची योजना चालेल हा अजित दादाचा वादा आहे, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button