breaking-newsताज्या घडामोडीपुणे

बुजविलेल्या खड्ड्यांमधील खडी रस्त्यांवर पसरल्याने अपघातांचा धोका

पुणे : शहरातील रस्त्यांची चाळण झाल्यानंतर खड्डे दुरुस्तीच्या कामांनी वेग घेतला असला तरी, ऐन पावसाळ्यात केलेली अशास्त्रीय पद्धतीच्या दुरुस्तीमुळे बुजविण्यात आलेल्या खड्ड्यांमधील बारीक खडी रस्त्यावर पसरण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांतच पुन्हा रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे खड्डे दुरुस्ती जीवघेणी ठरण्याची शक्यता निर्माण झाली असून खड्डे दुरुस्तीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्चही पाण्यात गेला आहे.

शहरात गेल्या काही दिवसांपर्यंत सुरू असलेल्या जोरदार पावसाने रस्त्यांची दुरवस्था होऊन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले. त्यामुळे ऐन पावसाळ्यातच महापालिकेच्या पथ विभागाकडून खड्डे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली. खड्डे बुजविण्याचे काम रात्रीही चालू ठेवत अनेक लहान मोठे खड्डे भरण्यात आले. मात्र या खड्डे दुरुस्ती तात्पुरती मलमपट्टी ठरल्याचे पुढे आले आहे.खड्डे दुरुस्ती करताना बारीक खडीचा वापर करण्यात आला आहे. मात्र घाईगडबडीत आणि अशास्त्रीय पद्धतीने खड्डे दुरुस्ती करण्यात आल्याने खडी रस्त्यावर येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे.

हेही वाचा     –    ‘प्रत्येक महिला सक्षम व्हावी हाच उद्देश’; सारिका शेळके 

इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार खड्डे दुरुस्ती होणे आवश्यक आहे. मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करत हाॅटमिक्स, कोल्डमिक्स, पेवर ब्लाॅकच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती केली जात आहे. काही रस्त्यांवरील खड्डे पेवर ब्लाॅक टाकून बुजविण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याचा पृष्ठभाग असमोतल झाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत असून काही रस्त्यांवर ‘पॅचवर्क’ची कामेही तकलादू ठरली आहेत. त्यामुळे सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची पुन्हा दुरुवस्था होण्यास सुरुवात झाली आहे.

पावसाने उघडीप न घेतल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला मर्यादा येत होत्या. गेल्या शनिवारपासून रात्री खड्डे बुजविण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि त्यावर करायचे ‘पॅचवर्क’ या दोन्ही कामांवर महापालिकेच्या पथ विभागाकडून लक्ष केंद्रित करण्यात आले. सिमेंटचा वापर करून खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली असून, ‘पॅचवर्क’साठीही सिमेंटचा वापर करण्यात येत आहे. तसेच अनेक खड्डे आणि ‘पॅचवर्क’ डांबरी मालाच्या साहाय्याने बुजविण्यात येणार आहेत. मात्र ही कामे गुणवत्तापूर्ण न झाल्यास रस्त्यांची दुरवस्था कायम राहणार आहे.

दरम्यान, इंडियन रोड काँग्रेसच्या निकषानुसार खड्डे दुरुस्ती करणे शक्य होणार नाही. निकषानुसार रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवावा लागणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळत रस्ते दुरुस्तीची काम केली जात आहेत, असा दावाही पथ विभागाकडून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button