मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी
पिंपरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (सोमवारी, दि. 5) पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीची पाहणी करणार आहेत. दुपारी बारा वाजताच्या सुमारास ते पिंपरी चिंचवड शहरात येतील. जुनी सांगवी येथे पाहणी करून ते पुण्याकडे रवाना होणार आहेत.
रविवारी (दि. 4) हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे रविवारी जिल्ह्यात विशेषत: घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडला. पवना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्याने पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली. अनेक घरांमध्ये पुराचे पाणी गेले.
हेही वाचा – ‘पुढच्या मार्च पर्यंतचे लाडकी बहीण योजनेचे पैसे बजेटमध्ये ठेवले’; देवेंद्र फडणवीस
तसेच पुणे येथे एकता नगर परिसरात देखील पुराच्या पाण्याने जीवन विस्कळीत झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराचा दौरा करणार आहे. दुपारी बारा वाजताच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पिंपरी चिंचवड शहरात येतील. ते जुनी सांगवी येथे पूर परिस्थितीची पाहणी करतील. त्यानंतर ते पाटील इस्टेट आणि एकता नगर येथे पाहणी करणार आहेत.