breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पूरस्थिती का निर्माण झाली? कारणे शोधण्यासाठी तीन सदस्यांची समिती

पुणे : मागील आठवड्यात शहरात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी पुणे महापालिकेने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरासह शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. नदीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले, नागरिकांचे संसार पाण्यात वाहून गेले. या परिस्थितीला नदीपात्रात टाकण्यात आलेला राडारोडा तसेच नदीसुधार प्रकल्पाचे काम जबाबदार असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच दररोज नवनवीन कारणे पुढे आणली जात आहे. त्यामुळे पूरपरिस्थितीचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी महापालिकेने ती सदस्यांची समिती नेमली आहे. या समितीने सात दिवसात अहवाल सादर केल्यानंतर पूरग्रस्त भागात कायमस्वरूपी उपाययोजना केल्या जाणार आहेत, असे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी सांगितले.

घाटमाथ्यावर पावसाने दमदार हजेरी लावल्याने खडकवासला धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याच्या साठा वाढला. त्यामुळे धरणातून विसर्ग सोडण्यात आला. धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरासह इतर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पुण्यात पूरपरिस्थिती झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पूरपरिस्थितीची वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासन गोंधळले असून त्यावर उपाययोजना सुचवल्या जात आहेत.

हेही वाचा  –  नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यात नवीन ‘एमआयडीसी’

पूरपरिस्थिती निर्माण होण्यामागे मूळ कारण नेमके काय आहे, हे शोधण्याचे काम महापालिकेने हाती घेतली आहे. त्यानुसार बांधकाम, ड्रेनेज आणि पथ विभागाकडून प्रत्येकी एक सदस्य असे मिळून तीन सदस्यीय समिती नेमली जाणार आहे. समिती नेमण्याचे आदेशदेखील काढण्यात आले असून समितीला सात दिवसात अहवाल सादर करावा लागणार आहे. तसेच या समितीमध्ये जलसंपदा विभागाचा एक निमंत्रित सदस्य देखील असणार आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील एकतानगरी तसेच इतर भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर महापालिकेच्या मदत पथकाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून काम होत नसल्याचे दिसून आल्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सिंहगड क्षेत्रीय कार्यालयाचे साहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र खलाटे यांच्यासह पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्यात उतरून नागरिकांना मदत कार्य पोहचविले. तसेच पूरपरिस्थितीनंतर परिसरात स्वच्छता मोहीम राबून नागरिकांना मोठा दिलासा दिला. यावेळी नागरिकांची स्वच्छतागृहेदेखील कर्मचाऱ्यांनी साफ करून दिली आहेत. तसेच परिसर स्वच्छ करून दिल्याने नागरिकांकडून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जाऊ लागले आहे.

कर्वेनगर ते शिवणे या भागातील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात राडारोडा टाकण्यात आला आहे. या भागातील मिळकतदारांनी नदीपात्रात राडारोडा टाकून सुमारे चार ते पाच एकर एवढे मोकळा भूखंड तयार केला आहे. त्यामुळे नदीपात्र उथळ झाल्याने पुराचे पाणी नागरी भागात शिरल्याने पूरपरिस्थिती निर्मााण झाली, असे सांगितले जात आहे. नागरिकांचे जीव गेल्यानंतर महापालिकेला नदीपात्रात भराव दिसला का, संतापजनक सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे.

नदीपात्रात निर्माण करण्यात आलेल्या भूखंड हा व्यावसायिक कारणासाठी वापर करण्याचा प्लान काही भूमाफियांनी केला असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. नदीपात्रातील या राडारोड्यामुळे एक भिंतच तयार झाली आहे. तसेच राडारोड्यामुळे पाण्याचा फुगवटा होऊन शेजारील परिसरात पाणी शिरत असून नागरिक पुरात सापडले, असे प्रशासनाने सांगितले असले तरी आता समितीचा अहलाव आल्यानंतर खरे कारण पुढे येणार आहे. त्यानंतर महापालिकेकडून पावले उचलली जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button