breaking-newsताज्या घडामोडीपुणे

पुण्यात पुन्हा सापडलं ड्रग्ज; 21 लाखांच्या मेफेड्रोनसह दोन तरुणांना अटक

पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे या शहराचं नाव वेगळ्याच दृष्टीने चर्चेत आहे. पोर्शे अपघाताच्या घटनेनंतर पुण्यातील बेकायदा पब आणि बार रेस्टॉरंटचा मुद्दा समोर आला होता. राज्य सरकार व पोलीस प्रशासनाने याची दखल घेत कारवाईही सुरू केली. मात्र, त्यानंतर काही दिवसांताच पुण्यातील एका हॉटेलमध्ये तरुणाई ड्रग्ज घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. या घटनेने पुन्हा एकदा पुण्यातील ड्रग्जच्या रॅकेटचा मुद्दा समोर आला होता. आता, पुन्हा एकदा कात्रज परिसरात 106 ग्रॅम मेफड्रोन सापडल्याने पुणे शहराला आणि येथील तरुणाईला झालंय काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, पोलिसांनी  या ड्रग्जसह दोन तरुणांना अटक केली आहे.

पुण्याच्या कात्रज परिसरातून 21 लाखांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आलं असून पोलिसांनी राजस्थानमधील दोघांना अटक केली आहे. कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी दोन तरुण आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, सापळा रचून ड्रग्जची विक्री करणाऱ्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

हेही वाचा     –     अजित पवार अमित शाहांना चोरून का भेटत होते? सुप्रिया सुळेंचा सवाल

आरोपीच्या ताब्यातून 21 लाख 38 हजार रुपयांचे 106 ग्रॅम मेफेड्रोनसह व दुचाकी असा 22 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय 22, मूळ रा. नयानगर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (वय 20, मूळ रा. कुशलावा, जि. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये राहतात. राजपूत आणि बिश्नोई मेफेड्रोन विक्रीसाठी कात्रज परिसरात दुचाकीवर येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यांची झडती घेतली असता 21 लाख रुपये किमतीचे 106 ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यातील ड्रग्जच्या घटनेवरुन आमदार रविंद्र धंगेकर व शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार व पोलीस प्रशासनाला लक्ष्य केलं होतं. पोलीस अधिकाऱ्यांना हफ्ते पोहोचत असल्यानेच पुण्यातील ड्रग्ज व पब संस्कृती वाढत असल्याचा गंभीर आरोपही या नेत्यांनी केला होता. त्यानंतर, पोलिसांनी धडक कारवाई मोहिम हाती घेतल्याचं दिसून आलं. त्यातच, आता कात्रज परिसरातूनही दोघांना अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button