ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कवी हा संतांचा वारसदार असतो

ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांचे प्रतिपादन

पिंपरी : कवी हा संतांचा वारसदार असतो. कवींनी आपला वारसा जपावा. प्रत्येक संत हा अगोदर कवीच होता. सातत्य आणि भक्तीच्या जोरावर त्यास संतत्व प्राप्त झाले. असे उदगार जेष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी काढले. स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिं. चिं. पुणे आयोजित, आषाढ काव्यधारा कवीसंमेलन, शनिवार दि. 27 जुलै रोजी, प्रतिभा महाविद्यालय येथे पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी, ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, “कविता रसयुक्त असावी. प्रत्येक कवींनी आपल्या जुन्या कवितांचे परिक्षण करावे. आपल्या काव्य लिखाणात सातत्य आणि मान्यवर कवींच्या काव्याचे वाचन कवीला एक दिशा देण्याचे काम करत असते. सातत्याने काव्य लिखाण केले तर एखाद दुसरी कविता कवीला नामांकित करत असते. तसेच अहेरराव यांनी विल्यम शेक्सपियरच्या साॅनेट पासून केशवसुताच्या सुनित पर्यंतच्या इतिहासाचा आढावा घेतला. या कार्यक्रमाला
डॉ. पी. एस. अगरवाल यांची विशेष उपस्थिती होती. डॉ. पी. एस. अगरवाल यांनी कांद्याची विडंबनात्मक कविता सादर केली.

आषाढधारा या कवीसंमेलनामध्ये, फुलवती जगताप यांनी, “धो धो पाऊस पडे सारखा, रस्त्यावरही पूर चढे.
पाणीच पाणी चहूकडे गं बाई, गेला रस्ता कुणीकडे”

आत्माराम हारे यांनी, थेंब थेंब पावसाला, विनंती केली मीच
जिथे जिथे दुष्काळ, तिथे येत जा रे तुच

हेमंत जोशी यांनी,
इतकी दुःखे भोगुन झाली सुख आल्यावर शंका येते
सुख राशींची लोळण घेणाऱ्या पायांवर शंका येते

जयश्री श्रीखंडे यांनी,
नभी दाटल्या मेघांना
हलके झूलवे वारा
रिमझीम वाजत गाजत
आल्या भुवरी जलधारा

योगिता पाखले यांनी, नवरा नकोच मला हक्क आणि कर्तव्य सांगायला
साहचर्याच्या नावेत बसायला मितवा होशील का!

साधना शेळके यांनी,
सरीवर येता सरी ,
अंग निघाले न्हाऊन
गंध मृदेचा कस्तुरी,
मना टाकतो मोहून

रानकवी जगदीप वनशिव यांनी, आला पाऊस पाऊस
चिंब भिजे तनमन
आयुष्याच्या झुल्यावर
गाणी गातो रानवन
‌‌
जयश्री श्रोत्रिय यांनी
आला आषाढ आषाढ कृष्ण मेघ दाटलेले
धारा येतील क्षणात चोहीकडे अंधारले..

मानसी चिटनीस यांनी
आकाशाच्या पोटामध्ये एक निळेसे तळे
तळ्यास लेऊन पंख विहरता कालच मी पाहिले
उठती नवथर तरंग ओले झुळूक जराशी येता

सीमा गांधी यांनी
येईल ग सखे श्रावण येईल गं
सोडण्या ढगांचे मौन…
इंद्रधनुशी कमान…
हळूच हसेल ढगां आडून…

विजय वडवेराव यांनी
उतावीळ संयमाचे ढग शेवटी फुटले
उरी वादळे घेऊन दोन पाऊस भेटले

विजय सातपुते यांनी पावसावरची कविता सादर केली.

शोभा जोशी यांनी
मी पाहिला पाऊस देखना
तो बोलतो माझ्या संगे
मी बोलते पुन्हा पुन्हा

दीपेश सुराणा यांनी,
पावसाची धून वाजे
मनमयूर हे नाचे
नव्या-नव्या स्वप्नांसाठी
नवे-नवे गीत ओठी

रूपाली अवचरे यांनी
पाऊस दारात पाऊस मनात हळूच सजून येतो
अवेळी साजण सईच्या मनात पाऊस बनून येतो

अशा आशियाच्या, पावसाच्या विविध छटा, कवींनी आपल्या कवितेतून सादर केल्या.

यावेळी रजनी अहेरराव, स्नेहा इंगळे, राजेंद्र धावटे सुरेश कंक, तानाजी एकोंडे, निलेश शेंबेकर, राजू जाधव, सुभाष चव्हाण, अशोक सोनवणे, श्री रॉय, नितिन हिरवे, सुहास घुमरे, कैलास भैरट, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, मंडळाचे उपाध्यक्ष, नंदकुमार मुरडे यांनी केले. मंडळाचे अध्यक्ष सविता इंगळे यांनी मंडळाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे कर्याध्यक्ष दिनेश भोसले यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button