ताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंची घोषणा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची विधानसभा निवडणुकी संदर्भात भूमिकेची मोठी चर्चा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांसंदर्भात घेतलेल्या भूमिकेची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी एनडीएला केंद्रात व महायुतीला राज्यात बिनशर्त पाठींबा राज ठाकरेंनी जाहीर केला होता. पण आता विधानसभा निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना राज ठाकरेंनी मनसे स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आहे. त्यावरून राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलेलं आहे. त्यात आता प्रकाश आंबेडकरांनीही राज ठाकरेंबाबत खोचक टिप्पणी केली आहे.

मनसे स्वबळावर लढणार, राज ठाकरेंनी केली घोषणा
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भारतीय जनता पक्षाला केंद्रात विजय मिळाला असला, तरी महाराष्ट्रातील भाजपाप्रणीत महायुतीची मोठी पीछेहाट झाल्याचं पाहायला मिळालं. खुद्द भाजपाच्या जागा २३ वरून घटून थेट ८ पर्यंत खाली आल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे महायुतीसोबत जाणार की वेगळा निर्णय घेणार? याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांबरोबरच राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत होती. अखेर राज ठाकरेंनी मुंबईत घेतलेल्या पदाधिकारी मेळाव्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

“युती होईल का? कोणत्या जागा मिळतील? असला कुठलाही विचार मनात कुणीही आणू नका. आपण जवळपास २२५ ते २५० जागा लढवणार आहोत. तसंच आज कुणी कितीही मोठ्याने घोषणा दिल्या तरीही तिकिट पक्कं असं समजू नका. कुणी कुठल्याही भ्रमात राहू नका. तसंच मला काही जणांनी सांगितलं की आपला पक्ष काहींना सोडायचा आहे. त्यांना मी रेड कार्पेट घालून देतो, त्यांनी खुशाल पक्ष सोडून जावं”, असं राज ठाकरेंनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

प्रकाश आंबेडकरांची खोचक प्रतिक्रिया
दरम्यान, प्रकाश आंबेडकरांनी शनिवारी सोलापूरमध्ये रात्री प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राज ठाकरे महाराष्ट्रात २२५ ते २५० जागा लढवणार असल्याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारणा केली असता त्यांनी काही शब्दांत खोचक उत्तर दिलं. “थँक यू व्हेरी मच, ते २२५ जागा लढवतायत त्याला आम्ही काय करणार?” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मराठा आरक्षणावरून शरद पवारांना केलं लक्ष्य
दरम्यान, यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवार यांनाही लक्ष्य केलं. शरद पवारांनी शनिवारी पत्रकार परिषदेत या मुद्द्यावर सगळ्यांना एकत्र घेऊन चर्चा करण्याचं आवाहन राज्य सरकारला केलं. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी उलट शरद पवार यांनीच भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलं.

“ही पळवाट आहे. राजकीय पक्ष म्हणून तुम्ही उद्या सत्तेत आलात तर तुम्हाला या स्थितीला उद्या तोंड द्यावं लागेल. तसं असेल, तर जरांगेंच्या मागणीच्या बाजूने तुम्ही आहात की विरोधात हे तुम्हाला स्पष्ट असायला हवं. हे सगळे ओबीसींच्या विरोधात आहेत. म्हणून या पळवाटा काढल्या जात आहेत. तुम्ही राजकीय भूमिका घेतल्यावर लोकांना तुमचा मुद्दा कळतो. त्यामुळेच आमच्याबद्दल ना ओबीसी नाराज आहेत ना मराठे नाराज आहेत”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button