breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘विधानसभेआधीच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार’; शरद पवारांचं आश्वासन

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सध्या राजकारण तापले आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची अहमदनगर येथे भेट घेतली. वीस मिनिटांच्या चर्चेअंती शरद पवार यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आरक्षणाबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीआधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन शरद पवारांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे निर्णय घेतील त्यांना आम्ही पाठिंबा देऊ, असा शब्दही शरद पवारांनी मराठा शिष्टमंडळाला दिला आहे. आरक्षणात राजकारण आणले जाणार नाही, असे स्पष्टीकरण देखील त्यांनी यावेळी दिले आहे.

हेही वाचा –  महाराष्ट्राला मिळाले नवे राज्यपाल, राष्ट्रपतींकडून घोषणा

यावेळी मराठा कार्यकर्ते गजेंद्र दांगट म्हणाले की, आज सकल मराठा समाजाने शरद पवार साहेबांची भेट घेतली. त्यात पवार साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला. जर एकनाथ शिंदे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार असतील तर राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवार यात कुठलेही राजकारण न करता मराठा आरक्षणासाठी एकनाथ शिंदेंना समर्थन देईल. आरक्षणाची लढाई आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आम्ही सर्व राजकीय नेते एकत्र येऊन विधानसभेच्या आधी हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन शरद पवारांनी दिले. मराठा समाजाने शरद पवारांना सूचित केले की, इतके दिवस मराठा समाजाने तुमच्यासाठी केले. मात्र, आता तुम्ही सर्व नेत्यांनी एकत्र येऊन मराठा समाजासाठी करावे. त्यावर देखील शरद पवारांनी सकारात्मक उत्तर दिले. विधानसभा निवडणुकीआधी तुम्ही गुलाल उडवाल, असा आम्हाला शब्द देण्यात आलेला आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळेल, असे संकेत शरद पवार साहेबांनी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

यावेळी मराठा कार्यकर्ते मदन आढाव म्हणाले की, आम्ही सगळे पवार साहेबांना भेटायला आलो होतो. आम्ही त्यांना सांगितलं की, आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे. पवार साहेबांनी आम्हाला सांगितले की, जो निर्णय मुख्यमंत्री घेतील मी त्याच्यासोबत राहील. मात्र, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितले की, इतक्या दिवस मराठा समाजात तुमच्यासोबत राहिलेला आहे. आता तुम्हाला द्यायची वेळ आली आहे तर ते तुम्ही दिले पाहिजे. बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना बोलावून मी माझं म्हणणं स्पष्ट करेल, असे पवार साहेबांनी म्हटल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button